नाशिक: बिअर दिली नाही म्हणून बारमालकासह त्याच्या मुलांवर टोळक्याचा प्राणघातक हल्ला
नाशिक (प्रतिनिधी): बिअर दिली नाही याचा राग आल्याने सात ते आठ जणांच्या टोळक्याने बारमालकासह त्याच्या दोन मुलांच्या डोक्यात बिअरची बाटली मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंबड परिसरात घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अशोक गोविंदराव काच्छेला (रा. होलाराम कॉलनी, शरणपूर रोड, नाशिक) यांचे अंबड परिसरात सुरेश प्लाझा बिल्डिंगमध्ये मैफिल बार अॅण्ड रेस्टॉरंट आहे.
काच्छेला हे दि. २९ जानेवारी रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास बार अॅण्ड रेस्टॉरंट बंद करण्याच्या तयारीत होते. त्यावेळी संशयित प्रशिक अढांगळे व गणेश खांदवे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे दुकानाजवळ आले.
अढांगळे याने काच्छेला यांच्याकडे बिअरची बाटली मागितली; मात्र हॉटेल बंद करण्याची वेळ असल्याने काच्छेला यांनी त्याला बिअर दिली नाही. त्याचा राग आल्याने अढांगळे याने त्यांना शिवीगाळ करून “आम्हाला बिअर दिली नाही, तर तुम्हाला मारून टाकू,” अशी धमकी देऊन बारमालकास मारहाण करू लागले.
- नाशिक शहरातील ‘या’ भागांत बुधवारी (दि. १ फेब्रुवारी) पाणीपुरवठा नाही…
- अनेक अडचणीतून मार्ग काढत नाशिकच्या तरुणावर दुसऱ्यांदा केलेले किडनी प्रत्यारोपण यशस्वी !
- नाशिक: गंगापूर रोडला लिफ्टच्या खड्ड्यात पडून १० वर्षीय मुलाचा मृत्यू
त्यावेळी काच्छेला यांचे निखिल काच्छेला व यश काच्छेला ही दोन्ही मुले हॉटेलबाहेर येऊन संशयित अढांगळे याला समजावून सांगत होती. त्यावेळी अन्य संशयित गणेश खांदवे यांनी त्यांच्या मित्रांना फोन करून बोलावले असता ७ ते ८ जणांचे टोळके घटनास्थळी आले.
त्यांनी बारमालकासह त्याच्या दोन्ही मुलांना दगडाने व त्यांच्या हातात असलेल्या बिअरच्या बाटलीने मारहाण करून निखिल काच्छेला यांना मारून त्यांच्या डोक्याला गंभीर जखम केली, तसेच बारमालक काच्छेला यांच्या हातावरही बाटली मारून त्यांना गंभीर जखमी केले, तसेच संशयितांनी जाता जाता “आज तुम्हाला मारूनच टाकतो,” असे म्हणत जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातातील बाटलीने व दगडाने पुन्हा मारहाण करून परिसरात दहशत पसरवली.
या घटनेत बारमालक अशोक काच्छेला, निखिल काच्छेला, यश काच्छेला हे तिघेही बापलेक जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात प्रशिक अढांगळे, गणेश खांदवे यांच्यासह त्यांच्या ७ ते ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.