नाशिक: प्राणघातक शस्त्रांसोबत इन्स्टाग्रामवर रील्स बनवणे पडले महागात; दोघांना अटक
नाशिक (प्रतिनिधी): प्राणघातक शस्त्रांसोबत इन्स्टाग्रामवर त्याचे रिल्स बनवून चमकोगिरी करणे दोन इसमांना चांगलेच महागात पडले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की गुन्हे शाखा युनिट १ चे पोलिस अमंलदार मुक्तार शेख यांना एक इसम प्राणघातक शस्त्र बाळगून इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून चमकोगिरी करत असल्याची गोपनिय माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदिप म्हस्दे, नाझिमखान पठाण, शरद सोनवणे, पोलिस नाईक प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश सांळूके, पोलिस अमंलदार मुक्तार शेख यांच्या पथकाने त्या इसमाचा शोध सुरु केला.
भारतनगर परिसरातून फैजान नईम शेख (वय १९, रा.भारतनगर, नाशिक) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता त्याच्या ताब्यातून एक स्टिलची धारदार तलवार पोलिसांनी हस्तगत केली. त्याने हे शस्त्र कुठुन आणले याबाबत माहिती घेतली असता त्याच परिसरात राहणार्या सचिन शरद इंगोले (वय २८) याच्याकडून घेतल्याचे शेखने सांगितले.
पोलिसांनी इंगोले यालाही ताब्यात घेत त्याच्याकडून लोखंडी गुप्ती हस्तगत केली. या दोघांविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात आर्म अॅट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत.