नाशिक: पेठ रोडला दोन गटांत हाणामारी, दोघांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न
नाशिक (प्रतिनिधी): जुन्या भांडणाचा दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी गैरकायद्याची मंडळी जमवून दोन जणांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस हवालदार शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी संदीप अशोक लाड, सूरज रमेश बोडके, विनोद रमेश बोडके, धीरज रमेश बोडके, शिवा देवराम शिंदे, देवराम लासू शिंदे, रमेश पांडुरंग बोडके, सचिन दीपक शिंदे, प्रेम शिंदे, तान्हा देवराम शिंदे, दीपक शिंदे व इतर चार ते पाच जण (सर्व रा. भराडवाडी, फुलेनगर, पंचवटी) यांनी काल (दि. 12) सायंकाळी 7 च्या सुमारास पेठ रोडवरील मच्छीबाजाराजवळ जुन्या भांडणाचा दाखल गुन्हा मागे घेण्याच्या कारणावरून गैरकायद्याची मंडळी जमवून, तसेच हातात लोखंडी रॉड व लाकडी दांडके घेऊन एकमेकांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून सार्वजनिक शांतता बिघडवली, तसेच या मारहाणीत तान्हा शिंदे, देवराम शिंदे, देवा शिंदे व संदीप लाड यांना मारहाण करून दुखापत केली, तसेच एकमेकांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत धमकी दिली.
तसेच मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून बारा जणांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खैरनार करीत आहेत.