पुन्हा जुळत आलेला संसार झाला उदध्वस्त: आधी सोशल मीडियाद्वारे प्रेम; मग महिलेस ब्लॅकमेल
नाशिक (प्रतिनिधी): किरकोळ वादातून पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीने सोशल मीडियावर परिचय झालेल्या एका तरुणासोबत मैत्री केली. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
उभयतांच्या भेटीचे खासगी फोटो संशयिताने मोबाइलमध्ये तिच्या नकळत काढून ठेवले होते. काही दिवसांनी पती-पत्नी पुन्हा एकत्र नांदण्यास तयार झाले. त्यामुळे विवाहितेने मित्राला भेटण्यास नकार दिला.
मात्र या मित्राने दोघांचे खासगी फोटो पतीसह तिच्या नातेवाईकांना पाठवल्याने या विवाहितेचा जोडणारा संसार परत मोडकळीस आला आणि ती पुन्हा एकाही पडली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडितेचे दिलेल्या तक्रारीनुसार, १ एप्रिल ते डिसेंबर २०२२ या काळात पतीपासून विभक्त राहत असताना सोशल मीडियावर रोहित करणसिंग पांचाल (२८, रा. दिल्ली) याच्याशी ओळख झाली. या ओळखीचे रुपांत प्रेमात झाले.
दोघांमध्ये वारंवार मोबाइलवर दोघे एकमेकांच्या जवळ आले. संशयित रोहित पांचाल हा नाशिक येथे येऊन पीडित विवाहितेला भेटला. दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली होती. संशयिताने त्याचे फोटो, व्हिडीओ मोबाइलमध्ये काढून घेतले होते.
दिल्लीमध्ये असताना संशयिताने पीडितेला मोबाइलवर व्हिडीओ कॉल करत स्क्रिन शाॅट काढून ठेवले. एकीकडे या दोघांमध्ये प्रेमसंबंध वाढत असतांना दुसरीकडे विवाहिता आणि तिच्या पतीच्या कुटुंबियांनी दोघांनी एकत्र यावे यासाठी प्रयत्न केले. आणि या प्रयत्नांना यश आले.
ही बाब पीडितेने संशयित प्रियकराला सांगितली व आपले संबंध संपुष्टात आल्याचे सांगत संशयिताला भेटण्यास नकार दिला. या रागातून संशयिताने अश्लील फोटो आणि व्हिडीओ पीडितेचा पती, मामा आणि आई-वडिलांना पाठवून दिले. तसेच सोशल मीडियावर व्हायरल केले. नातेवाइकांना आक्षेपार्ह असे फोटो पाठवण्यात आल्याने या विवाहितेचा पुन्हा जुळत आलेला संसार मोडल्याने ही विवाहीता पुन्हा एकाकी पडली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
पीडितेकडून उकळले पैसे:
संशयित जुलै महिन्यात पीडितेच्या घरी आला व त्याने तिला मारहाण केली. तसेच धमकी देत आॅनलाइन पैसे घेतले. एवढेच नव्हे तर हे प्रकरण मिटवायचे असल्यास आणखी पैशांची मागणी केली. त्यास पीडिीतेने सोन्याचे दागिने, रक्कम दिली, असे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.