नाशिक: दोन महिन्यापूर्वीच लग्न झालं, मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं… कुटुंबांवर शोककळा
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे. रोजच घडणाऱ्या अपघातांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. अशातच बागलाण तालुक्यातील अंबासन गावावर युवा शेतकऱ्याच्या मृत्यूनं दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विशेष म्हणजे, दोनच महिन्यांपूर्वी तरुणाचे लग्न झाले होते. त्यातच एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाल्याने कुटुंबांवर शोककळा पसरली आहे. प्रशांत हिरालाल कोर असे या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. राहुल हा मूळचा बागलाण तालुक्यातील अंबासन या गावात राहणारा. उच्चशिक्षित आणि मनमिळावू स्वभाव असल्याने त्याला पंचक्रोशीत ओळखले जायचे.
मात्र सोमवारी झालेल्या अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. प्रशांत हा मालेगाव तालुक्यातील द्याने येथील मामाच्या गावी गेला होता. काम आटोपल्यानंतर मामांनी मुक्कामाचा आग्रह धरला मात्र, घरी जावे लागेल असे सांगून अंबासनकडे दुचाकीने निघाला होता. दरम्यान, मालेगाव जवळील अजंग गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने प्रशांत जखमी झाला. उपचारासाठी मालेगाव येथे रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी राहुलला मृत घोषित केले.
प्रशांत हा अंबासन येथून सकाळीच मामाच्या गावी द्याने येथे गेला होता. सायंकाळपर्यंत काम आटोपल्याने घरी निघण्याच्या तयारीत होता. यावेळी मामाने राहुलला थांबण्यास सांगितले. मात्र घरी जायचंय म्हणून तो दुचाकीवरून अंबासन येथे निघाला. मालेगावहून अंबासनच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना अंजग गावानजीक असलेल्या भवानी मातेच्या टेकडीजवळ दुचाकीचा अपघात झाला.
यात प्रशांत यास गंभीर दुखापत झाल्याने स्थानिक तरूणांनी त्याला तात्काळ मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. वडनेर खाकुर्डी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशांतच्या वडिलांचे दीड वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे तो घरीच शेती सांभाळत होता. घरात दोन बहिणी असून एका बहिणीचे लग्न झाले, तर नुकतेच जानेवारी महिन्यात प्रशांतचा विवाह सोहळा पार पडला. होता. आता लहान बहिणीचेही लग्न करण्याचा विचार होता. अशातच त्याच्या मृत्यूने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाजार समितीचे माजी सभापती खेमराज कोर यांचे ते पुतणे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, काका, काकू असा परिवार आहे…