नाशिक: पोटच्या दोघा मुलांनी पैशांसाठी घोटला जन्मदात्या आईचा गळा; आत्महत्येचा रचला होता बनाव
नाशिक (प्रतिनिधी): आर्थिक वादातून दोघा पोटच्या मुलांनी जन्मदात्या आईचा गळा घोटून खून केला.
हा प्रकार दाभाडीच्या गिसाका कॉलनीत सोमवारी (30 जानेवारी) सकाळी घडला असून मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे.
सुलकनबाई किसन सोनवणे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
आई आणि मुलाच्या पवित्र नात्याला कलंकित करणाऱ्या दोघा, मुलांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुलकनबाई या मोठा मुलगा भगवान किसन सोनवणे व लहान मुलगा संदीप किसन सोनवणे यांच्यासोबत राहत होत्या. पैशांच्या कारणावरुन दोन्ही मुले त्यांच्याशी वाद घालत होते. त्यातून भगवान आणि संदीप यांनी सुलकनबाई यांचा दोरीने गळा आवळून खून केला.
प्रारंभी दोघांनी सुलकनबाईने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दोघांनी गळा घोटून मारल्याची कबुली दिली. सुलकनबाई यांचे पती गिसाका कारखान्यात वॉचमन होते. पतीच्या मृत्यूनंतर सुलकनबाई यांनी मुलांचा सांभाळ केला. पतीला मिळालेल्या पैशांतून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. याच पैशाची सातत्याने मागणी करुन मुले त्यांच्याशी वाद घालत असल्याचे समोर आले आहे.