Nashik Breaking : नाशिकमध्ये वॉर्डबॉयचा महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला
नाशिक (प्रतिनिधी): रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांबाबत तक्रारी आल्याने त्याचा जाब विचारल्याच्या रागातून संशयित वॉर्डबॉयने हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर कात्रीने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.
याप्रकरणी संशयित वॉर्डबॉय अनिकेत डोंगरे (रा. संत कबीरनगर, भोसला स्कुलच्या मागे, नाशिक) यास गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलिसात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गंभीररित्या जखमी महिला डॉ. सोनल अविनाश दराडे यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात आल्याने त्यांची प्रकृती स्थिर आहे.
गंगापूर रोडवरील नामांकित हॉस्पिटलमध्ये सदरील घटना घडली.
सुकदेव नामदेव आव्हाड (रा. शांतिनिकेतन कॉलनी, प्रसाद मंगल कार्यालयाजवळ, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, गंगापूर रोडवरील केबीटी चौकात खासगी नामांकित हॉस्पिटलमध्ये आव्हाड यांच्या भगिनी डॉ. सोनल दराडे या कार्यरत आहेत. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांना वॉर्डबॉय मार्फत सेवा पुरविल्या जातात. मात्र संशयित अनिकेत डोंगरे याच्याबाबत काही रुग्णांनी तक्रारी करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची गंभीर दखल डॉ. सोनल दराडे यांनी केली.
- नाशिक : वणी गडावर निघालेल्या भाविकांच्या गाडीचा मोठा अपघात, 23 जण जखमी
- कोरोना रिटर्न: नाशिकमध्ये ८०० बेड्स, ४०० मेट्रिक टन ऑक्सिजनची व्यवस्था
- नाशिकमध्ये कॅनडा कॉर्नरला विद्यार्थ्यांच्या रूममध्ये सिलेंडरचा स्फोट, स्लॅबही कोसळला!
त्याबाबत त्यांनी दुपारी वॉडबॉय डोंगरे यास बोलावून घेत त्याच्या कामातील हलगर्जीपणाबाबत विचारणा करीत जाब विचारला. त्याचा राग मनात धरून संशयित डोंगरे याने रात्री डॉ. सोनल दराडे यांच्या केबिनमध्ये शिरला आणि पाठीमागून मानेवर कात्रीने वार केला. तसेच पोटात उजव्या बाजुला कात्री खुपसली. यामध्ये डॉ. सोनल या गंभीररित्या जखमी झाल्या. तसेच मोठयाप्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यांना तात्काळ ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन वैद्यकीय उपचार करण्यात आले.
दरम्यान हॉस्पिटल प्रशासनाकडून याबाबतची माहिती तात्काळ डॉ. सोनल यांचे भाऊ सुकदेव आव्हाड यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची माहिती घेतली. यावेळी उपस्थित नर्सेस व डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार आव्हाड यांनी गंगापूर पोलिसात फिर्याद दिली.
त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्यात प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित अनिकेत डोंगरे यास अटक करण्यात आली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक नितीन पवार हे करीत आहेत.