नाशिक: खासगी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू तर मैत्रीण जखमी
नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडवरील हॉटेल पंचवटी एलाईट जवळ भरधाव बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेली मृत युवकाची मैत्रीण जखमी झाली आहे.
हरीष जाधव (मुळ रा.पारोळा,जि.जळगाव हल्ली आनंवली) असे मृत तरूणाचे नाव आहे.
याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाधव मंगळवारी (दि.८) सकाळच्या सुमारास मैत्रीण रितीका शिंदे हिस आपल्या दुचाकीवर (जीजे २६ ई ०४८३) बसवून सातपूर कडून सीबीएसच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. त्र्यंबकरोडने भरधाव आलेल्या अज्ञात खासगी बसने पंचवटी एलाईट या हॉटेल परिसरातील सिग्नलवर अचानक सिध्दार्थनगरच्या दिशेने वळण घेत असतांना दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार मित्र आणि मैत्रीण जखमी झाली होती.
गंगापूर पोलिसांनी दोघांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता जाधव यास वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले तर जखमी युवतीवर उपचार सुरू असून याबाबत मृताचा भाऊ संजयदीप जाधव (रा.वसंतनगर,पारोळा) याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिस ठाण्यात अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक येसेकर करीत आहेत.