नाशिक: कामगारांच्या १ कोटी रुपयांचा कंपनी मालकाकडून अपहार
नाशिक (प्रतिनिधी): कंपनी कामगारांच्या सोसायटी आणि शेअर्स रक्कम तसेच कर्जाच्या हप्त्यांची नियमित रक्कम एम्प्लाॅइज को-ऑप. क्रेडिट सोसायटीत भरणा न करता कंपनीमालकाने १ कोटी ३ लाख ९० हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार सोसायटीच्या लेखापरीक्षणात उघडकीस आला.
याप्रकरणी शासकीय लेखापरीक्षकांच्या तक्रारीनुसार, कंपनी मालकाविरुद्धच सातपूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातपूर एमआयडीसीतील प्रीमियम टूल्स कंपनीचे मालक संशयित श्याम चंद्रकात केळुस्कर (रा. सातपूर) यांच्या कंपनीतील कामगारांनी एम्प्लाॅइज सोसायटीची स्थापना केली होती.
यात, सप्टेंबर २०१४ पासून कामगारांच्या पगारातून शेअर्स आणि कामगारांंच्या कर्जाचे हप्ते, व्याज अशी रक्कम महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कायद्यानुसार कपात केली जात होती.
ही रक्कम सोसायटीते जमा करणे आवश्यक होते. तसेच वेतन अधिनियम कायद्यानुसार कंपनीला अनिवार्य असलेली रक्कम भरणे आवश्यक होते. मात्र, केळूस्कर यांनी १ कोटी ३ लाख ९० हजार रुपयांची रक्कम भरणाच केला नसल्याचे उघडकीस आली आहे. यावरुन कंपनी कामगार आणि शासनाची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. त्यानुसार कामगार आणि सोसायटीचे लेखापरीक्षक संतोप कदम यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.