नाशिक (प्रतिनिधी): काही महिन्यांपासून एसटीचा संप सुरूच आहे.
त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
आज नाशिकमधील आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
एसटी संपामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
शिवनाथ ज्ञानदेव फापाडे, असं आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. शिवनाथ हे ठाण्यातील शहापूर आगारात गेल्या आठ वर्षांपासून एसटीचे चालक म्हणून कार्यरत होते. आज त्यांनी नाशिक येथे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अपुरे वेतन आणि काही महिन्यांपासून सुरू असलेला एसटीचा संप त्यामुळे ते आर्थिक विवंचनेत होते. मुलांचा सांभाळ कसा करावा? अशी चिंता त्यांना होती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
- नाशिक: रंगपंचमीच्या दिवशी भर रस्त्यावर तब्बल ५० फुट कारंजा !
- नाशिक महानगरपालिका आयुक्तपदी रमेश पवार, अखेर शिक्कामोर्तब झालं!
गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. तसेच त्यांना पगारवाढ देखील दिली आहे. पण, एसटीचे राज्य परिवहन खात्यात विलनीकरण झाल्याशिवाय आम्ही संप मागे घेणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यावर सरकारने समिती स्थापन केली होती. या समितीने अहवाल सादर केला असून एसटी कर्मचाऱ्यांचं विलनीकरण शक्य नाही, असं या अहवालातून समोर आलं आहे. तरीही कर्मचारी संपावर ठाम आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असून राज्य सरकारला अहवालावरील निर्णय देण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
संपामुळे काही एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर काही परत कामावर रुजू झाले आहेत. पण, संपाच्या काळातील पगार त्यांना मिळाला नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी आर्थिक विवंचनेत आहेत. आतापर्यंत जवळपास १०० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आशिष शेलार यांनी विधानसभेत मांडलेल्या स्थगन प्रस्तावात दिली आहे.