नाशिक: एक करोड रुपयाची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून महिलेला २० लाखांचा गंडा
नाशिक (प्रतिनिधी): एक करोड रुपयाची लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून महिलेला २० लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे…
एक करोड रुपयांची लॉटरी लागली असून, त्यापोटी टॅक्स भरण्यास सांगून आठ जणांच्या टोळीने एका महिलेला सुमारे 20 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी सुजाता महेंद्र शिरसाठ (वय 56, रा. दीपाली सोसायटी मधुबन कॉलनी, मखमलाबाद, पंचवटी, नाशिक) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.
आरोपी राजेंद्र भारद्वाज, विजय नारायण, दिनेश मेन, सोनिया, दिव्य वर्मा, राहुल सिंग, राकेशकुमार व सुनील यादव (सर्वांचा पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांनी संगनमत करून फिर्यादी शिरसाठ यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधला. “तुम्हाला एक करोड रुपयांची लॉटरी लागली असून, ही एक करोडची रक्कम मिळविण्यासाठी तुम्हाला टॅक्स भरावा लागेल,” असे त्यांनी फोनद्वारे सांगितले.
नाशिक: ‘या’ कारखान्यातील तब्बल ४० लाखांची वीजचोरी उघडकीस; फौजदारी गुन्हा दाखल
तसेच टॅक्स भरण्यासाठीची रक्कम दिव्य वर्मा, राहुल सिंग, राकेश कुमार व सुनील यादव यांच्या बँक खात्यावर भरावी, असे सांगितले. त्यानुसार शिरसाठ यांनी एक करोड रुपयांची लॉटरी लागली या बोलण्यावर विश्वास ठेवला. त्याप्रमाणे दि. 7 डिसेंबर 2018 ते 13 मार्च 2019 यादरम्यानच्या कालावधीत शिरसाठ यांनी वेळोवेळी आरोपींच्या बँक खात्यात 19 लाख 77 हजार 142 रुपयांची रक्कम जमा केली; मात्र तीन-चार महिन्यांचा कालावधी उलटूनही लॉटरीमध्ये लागलेले एक करोड रुपये मिळाले नाहीत, तसेच याबाबत आठ आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र तो होऊ शकला नाही.
दरम्यान एकूणच एक करोड रुपयांच्या लॉटरीच्या आमिषापायी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिरसाठ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चोपडे करीत आहेत.