नाशिक: एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्म्हत्येप्रकरणी २१ सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक: एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्म्हत्येप्रकरणी २१ सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक (प्रतिनिधी): सातपूरच्या राधाकृष्णनगर परिसरात राहणार्‍या शिरोडे कुटुंबातील तिघांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्‍कादायक घटना काल (दि. २९) उघडकीस आली.

यामध्ये पित्यासह दोन सख्ख्या भावांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याच्या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.

दरम्यान, शिरोडे पितापुत्रांनी आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची बाब समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडील दीपक शिरोडे (वय ५५) प्रसाद शिरोडे (वय २५) व राकेश शिरोडे (वय २३) अशी आत्महत्या करणार्‍या बापलेकांची नावे आहेत.

या तिघांनी एकाच घरात तीन वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. शिरोडे कुटुंबीय हे मूळचे देवळा तालुक्यातील उमराणे येथील रहिवासी असून, गेल्या दहा वर्षांपासून ते व्यवसायानिमित्त नाशिकमध्ये स्थायिक होते. राधाकृष्णनगर परिसरात बोलकर व्हॅली पोलीस चौकीसमोर आशापुरा निवास येथे ते राहत होते. वडील दीपक हे अशोकनगर शेवटचा बस स्टॉप येथील भाजी बाजारात फळ विक्री करीत होते, तर त्यांची दोन्ही मुले प्रसाद व राकेश चारचाकी वाहनांवर फळ विक्रीचा व्यवसाय करीत असत.

हे ही वाचा:  नाशिक: चेन स्‍नॅचरसह दोघा सराफांना 3 वर्षे सश्रम कारावास !

आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने शिरोडे कुटुंबीय कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे ते नैराश्यात होते. काल (दि. २९) दुपारी दीपक शिरोडे यांच्या पत्नी नेहमीप्रमाणे घराचा दरवाजा बंद करून पूजा करण्यासाठी त्या मंदिरात गेल्या होत्या. याच वेळी वडिलांसह दोन्ही मुलांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेऊन घरातील तिन्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये पंख्याला गळफास घेत आपले जीवन संपविले. दीपक शिरोडे यांच्या पत्नी मंदिरातून घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला; मात्र आतून काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश करताच त्यांना आपल्या पतीसह दोन्ही तरुण मुले गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसले. या घटनेमुळे त्यांनी जोरदार हंबरडा फोडला.

हे ही वाचा:  नाशिक: प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात, चार जण जखमी

आत्महत्या केलेल्या प्रसाद शिरोडे यांच्या पत्नी गर्भवती असल्याने त्या मुंबई येथे माहेरी गेल्या होत्या. काल (दि. २९) सकाळीच त्यांची प्रसूती होऊन त्यांना कन्यारत्न प्राप्‍त झाले होते. आपल्या कुटुंबात लक्ष्मीचे आगमन झाल्याची वार्ता शिरोडे कुटुंबीयांनी सगळीकडे कळविली होती. अशा आनंदाच्या प्रसंगातच त्यांनी कठोर निर्णय घेतला. त्यामुळे सातपूर परिसरात हळूहळू व्यक्‍त केली जात आहे. या घटनेनंतर पोलिसांना चिट्ठी आढळून आली असून, या चिठ्ठीत कर्जबाजारीपणा व सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्‍लेख असल्याचे समजते.

हे ही वाचा:  नाशिक: ऑनर किलिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टात आरोपीला २० वर्षे कारावास

दरम्यान, या प्रकरणी प्रतिभा दीपक शिरुडे (वय ४५) यांनी सातपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार एम. आर. धामणे, राजाराम दा. काळे, मुकेश भि. लोहार, भास्कर सोनवणे, मुकेश सोनवणे, शांताराम नागरे (रा. पिंपळगाव), संजू पाटील, शेखर पवार (दोघे रा. शिवाजीनगर), प्रकाश व्ही. गोरे, नलिनीताई शेलार, बाविस्कर साहेब (रा. अशोकनगर, कैलास गोर्‍हाणे, भूषण चौधरी, गरीबनवाज, भरत वनजी पाटील, किरण बोडके, गिरीश खटाडे, मुरली पाटील, अरुणा पाटील, आकाश इंगळे व शरद पिंगळे या २१ खासगी सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790