नाशिक (प्रतिनिधी): एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, आदिवासी विकास भवन विभागाची संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व लिपिक यांनी सुमारे ४७ लाख ४८ हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
सहाय्यक प्रकल्प अधिकारी नितांत कांबळे यांनी आज दिलेल्या तक्रारीवरून चौघांविरुद्ध मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिंडोरी येथील प्राथमिक अनुदानित आश्रमशाळा (रवळगाव) येथील शिक्षक संशयित हर्षल पुंडलिक चौधरी यांचे वेतन आणि फरक देयक प्रकल्प अधिकारी कार्यालय यांच्याकडे मंजुरीस आलेले नव्हते. तसेच प्रकल्प अधिकाऱ्यांकडून त्यांचे वेतन आणि फरकाची ४७ लाख ४७ हजार ६६१ रक्कम अदा करण्यास मंजुरी दिलेली नव्हती.
कार्यालयातील शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गाने यूजर आयडीचा वापर करून परस्पर देयक अदा करून घेतले. अनुदानित आश्रम शाळेचे मे महिन्याचे वेतन देयक तयार करताना लेखा विभागातील उपलेखापाल रूपाली पवार यांच्या लक्षात प्रकार आला. त्यांनी लेखापाल यांना माहिती दिली. त्यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली.
प्रकरणाची चौकशी केली असता कुठल्याही प्रकारची मंजुरी नसताना तसेच बनावट कागदपत्रे प्रणालीत सादर करून परस्पर देयक अदा करून घेत प्रकल्प अधिकारी कार्यालयाचे फसवणूक केल्याचे उघड झाले.
संशयित शिक्षक हर्षल पुंडलिक चौधरी, मुख्याध्यापक लोकेश पाटील, लिपिक गोपीनाथ बोडके, संस्थाचालक श्री. बोडके यांनी संगनमत करून फसवणूक केल्यासंदर्भात सहाय्यक प्रकल्प अधिकारी कांबळे यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली.
![]()


