नाशिक: अल्पवयीन मुलीने मित्राला दिले चक्क घरातील २० लाखांचे दागिने
नाशिक (प्रतिनिधी): बालपणीच्या मित्राची अडचण दूर करण्यासाठी एका अल्पवयीन मुलीने घरातील सुमारे २० लाख ५० हजार रूपये किमतीचे दागिणे मित्राच्या स्वाधिन केल्याची घटना उघडकीस नाशिकमध्ये घडली आहे..
ही बाब मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी पोलिस स्थानकात धाव घेतली.
या अपहारप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दागिन्यांचा अपहार करणारा तिचा मित्रसुद्धा अल्पवयीनच आहे.
याबाबत खुटवडनगर भागात राहणा-या १६ वर्षीय युवतीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलगी व संशयित बालपणापासूनचे मित्र मैत्रीण आहेत. गेल्या सप्टेंबर महिन्यात संशयित व त्याच्या मित्रांनी मुलीस गाठून सदर मित्र अडचणीत असल्याचे सांगितले. यावेळी मुलीस विश्वासात घेत भामट्यांनी पैशांची नितांत गरज असल्याचे सांगून काही कालावधीसाठी दागिन्यांची मागणी केली. घरातील लाखोंचे दागिने अचानक गायब झाल्याने कुटुंबियांनी शोधा शोध केली असता ही घटना उघडकीस आली.
मुलीच्या चौकशीत हा प्रकार समोर येताच पालकांनी पोलिसांत धाव घेतली असून याप्रकरणी संशयिताविरोधात अल्पवयीन मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन दागिन्यांचा अपहार केल्याप्रकरणी भारतीय दंड विधान ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा (गुन्हा रजिस्टर क्रमांक: ०५२४/२०२२) दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास अंबड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खतेले करीत आहेत.