नाशिकवर ओमिक्रॉनचे सावट? पश्चिम आफ्रिकेतून आलेली व्यक्ती कोरोनाबाधित
नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचे सावट नाशिकवर जाणवू लागले असून पश्चिम आफ्रिकेतील माली या देशातून नाशकात आलेला विदेशी नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
त्याचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठवले आहेत.
त्याला ओमिक्रॉनचा संसर्ग आहे किंवा नाही याची तपासणी होणार आहे.
हा प्रवासी ज्या हॉटेलमध्ये उतरला, तेथील १२ कर्मचाऱ्यांच्या तपासण्या केल्या असून त्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
मुंबई विमानतळावर शनिवारी उतरल्यानंतर संबंधित प्रवासी रविवारी नाशिकमध्ये दाखल झाला. त्यानंतर त्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून महापालिकेच्या पथकाला दिल्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली गेली. त्यात तो कोरोनाबाधित असल्याचे आढळल्यानंतर त्याला नूतन बिटको रुग्णालयात हलवत अलगीकरणात ठेवण्यात आले.
नाशकात ६७६ विदेशी प्रवासी:
गेल्या पंधरा दिवसांत विविध देशांतून तब्बल ६७६ विदेशी नागरिक, पर्यटक, प्रवासी नाशकात दाखल झाले. आतापर्यंत २५३ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. माली देशातून आलेला प्रवासी वगळता सर्व २५२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांची कोरोना चाचणी महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून केली जात आहे.