नाशिकमध्ये १ लाख १७ हजार रुपये किमतीचा अवैध गुटखा जप्त; दोघांना अटक
नाशिक (प्रतिनिधी): सिडकोतील लेखानगर भाजी मार्केट परिसरातून अवैधरीत्या प्रतिबंधात्मक गुटख्याचा साठा शहर गुन्हे शाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने छापा टाकून जप्त केला.
याप्रकरणी पथकाने दोघांना अटक करीत, त्यांच्याकडून १ लाख १७ हजार रुपयांचा प्रतिबंधात्मक गुटखा जप्त केला आहे.
अतुल बापू पाटे (३८, रा. महाले फार्म, सिडको), नीलेश आनंदा वाणी (३७, रा. दत्त चौक, सिडको), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे असून, त्यांना तपासासाठी अंबड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
अमलीपदार्थ विरोधी पथकाने घरात प्रतिबंधात्मक गुटख्याचा साठा करून त्याचा पुरवठा करण्याचा डाव उधळून लावला आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये शहर हद्दीत अमलीपदार्थ विक्री व साठा करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू आहे.
अंमलदार देवकिसन गायकर यांना याबाबत खबर मिळाली होती. त्यांनी पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक हेमंत नागरे यांना माहिती दिल्यानंतर लेखानगर भाजी मार्केट परिसरात सहाय्यक उपनिरीक्षक रंजन बेंडाळे,
अंमलदार गणेश भामरे, संजय ताजणे, नितीन भालेराव, विनायक आव्हाड, चंद्रकांत बगाडे, योगेश सानप, रवींद्र दिघे, अनिरुद्ध येवले, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे आणि महिला अंमलदार अर्चना भड यांनी सापळा लावला.
मंगळवारी (ता. ३०) सकाळी सातच्या सुमारास गुटखा खोलीतून दुसऱ्या वाहनात टाकताना दबा धरून असलेल्या पथकाने संशयितांना ताब्यात घेत कारवाई केली. दरम्यान, संशयित पाटे हा दुचाकीवरून (एमएच १५ जीटी ०४४५) ९ हजारांचा प्रतिबंधित गुटखा घेऊन जात असताना, तो त्याने पुरवठादार वाणी याच्याकडून घेतला होता.
त्यामुळे पथकाने वाणीची घरझडती घेत १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. संशयितांविरुद्ध अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्याची कारवाई सुरु आहे. असे असतांना शहरातील अनेक पटपऱ्यांवर गुटखा येतो कुठून असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत.