नाशिकमध्ये विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला जमावाने धु-धू धुतले
नाशिक (प्रतिनिधी): अनेकदा छेड काढणाऱ्या तरुणांना जमावाकडून चोप दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो.
पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर पोलिसही चांगलाच समाचार घेतात. मात्र तरीदेखील अशा घटना वारंवार घडतात.
अशीच एक घटना नाशिक शहरात उघडकीस आली आहे. पाथर्डी फाटा परिसरात मुलीची छेड काढणाऱ्या एका तरुणाला जमावाने धुधू धुतले आणि नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
नाशिक शहरांत दिवसेंदिवस महिलांच्या छेड छाड आणि विनयभंगाचे गुन्हे घडण्याचे प्रमाण वाढते आहे.
अनेकदा टवाळखोर शाळकरी मुलींना टारगेट करून त्रास देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. अशातच नाशिक शहरात एका शाळकरी मुलींची छेड काढण्यात आल्याची घटना घडली असून टवाळखोरांना मुलींच्या पालकांनी आणि जमावाने बेदम चोप दिला आहे. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरातमध्ये ही घटना घडली आहे. मुलीची छेड काढण्यात आल्यानंतर संतप्त जमावाने संबंधित तरुणाला चांगलाच प्रसाद दिला आहे.
नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात राहणारी मुलगी या मार्गावरून शाळेत ये जा करत असते. अशातच शाळा सुटल्यानंतर मुलगी घराच्या दिशेने जात असतांना एक्सप्रेस इन हॉटेल जवळ एका तरुणाने छेड काढली होती, मात्र ही घटना वारंवार घडत असल्याने मुलींनी त्यांच्या पालकांना याबाबत सांगितली. पालकांनी यावर तातडीने संबंधित व्यक्तीचा शोध घेत त्याला विचारणा केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीचे उत्तर दिल्याने त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक जमल्याने त्यांनीही बेदम मारहाण केली आहे. तरुणाचे अक्षरशः कपडे फाटेपर्यन्त जमावाने तरुणाला धुधू धुतले आहे. मात्र यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने संबंधित तरुणाला इंदिरानगर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.