नाशिकमध्ये दोन पोलीस कर्मचार्यांना कामात अडथळा आणत लाकडी दांड्याने मारहाण
नाशिक (प्रतिनिधी): नाशिकमध्ये दोन पोलीस कर्मचाऱ्यांना कामात अडथळा आणत लाकडी दांड्याने मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे.
घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेची माहिती एमपीडीवर भरत असताना एका युवकाने दोन पोलीस कर्मचार्यांना लाकडी दांड्याने मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी पोलीस हवालदार मदन यशवंत बेंडकुळे हे काल दुपारी कर्तव्य बजावत होते.
त्यावेळी डेल्टा मोबाईलवर एक कॉल आला.
बेंडकुळे व त्यांच्यासोबत पोलीस शिपाई नवनाथ उगले हे दोघे घटनास्थळी गेले. यावेळी वडाळा नाका येथील रेणुकानगर येथे घटनेची माहिती एमपीडीवर भरत होते. त्याचा राग आल्याने आरोपी विकास मुकेश लाखे (रा. रेणुकानगर, नाशिक) याने बेंडकुळे यांच्या हातातील एमटीडी खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोन्ही पोलिसांनी लाखे याला अडविले असता त्याने जवळच पडलेल्या लाकडी दांड्याने मारहाण करीत शिवीगाळ केली, तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला.
दरम्यान या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात विकास लाखे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिते करीत आहेत.
नाशिकच्या ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: चोर असल्याची अफवा; रस्ता चुकलेल्या दाम्पत्याला बेदम मारहाण; पतीला चाकू खुपसला