नाशिकच्या डॉक्टरची सिन्नरमध्ये आत्महत्या; सलाइन लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

नाशिकच्या डॉक्टरची सिन्नरमध्ये आत्महत्या; सलाइन लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

नाशिक (प्रतिनिधी): नाशिकच्या गंगापूररोड भागात राहणाऱ्या एका एमबीबीएस डॉक्टरने यकृताचा बळावलेला आजार आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून सिन्नर येथील एका लॉजमध्ये आत्महत्या केली.

हा धक्कादायक प्रकार रविवारी (दि. १०) सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

डॉ. स्वप्नील दीपक पाटील (३७) असे त्यांचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहून ठेवलेली नोटही पोलिसांच्या हाती लागली आहे.

सिन्नर शहरातील बसस्थानकाजवळील हिरालाल टॉवरमधील हॉटेल प्रेसिडेंट लॉजमध्ये डॉ. स्वप्नील पाटील हे शनिवारी (दि. ९) दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आले होते.

रूम नं. १०९ त्यांनी भाड्याने घेतल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास या रूममधून बाहेर आल्याचे सीसीटीव्हीत दिसले. त्यानंतर त्यांनी आपल्या रूमचा दरवाजाच उघडला नाही. रविवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास संशय बळावल्याने लॉजवरील कर्मचाऱ्याने दरवाजा ठोठावला. मात्र आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सदर कर्मचाऱ्याने दरवाजाच्या वरच्या भागात असलेल्या खिडकीतून आत पाहिले असता बेडवर डॉ. पाटील दिसून आले. माजी नगरसेवक शैलेश नाईक यांनी यासंदर्भात सिन्नर पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक सुदर्शन आवारी, हवालदार चेतन मोरे यांनी घटनास्थळी धाव घेत रूमचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला.

यावेळी डॉ. पाटील यांचा मृतदेह बेडवर पडलेला दिसून आला. स्वतःच डॉक्टर असल्याने त्यांनी रूमच्या खिडकीला सलाइन टांगून ते आपल्या हाताला लावून घेतले होते. याशिवाय काही गोळ्याही त्यांनी सेवन केल्याचे आणि त्याची अर्धवट रिकामी पाकिटे मृतदेहाजवळ आढळून आली.

दारूची बाटलीही घटनास्थळी पडून होती. पोलिसांनी जागेवर पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. डॉक्टरांनी रक्तनमुना आणि व्हिसेरा राखून ठेवला असून डॉ. निर्मला गायकवाड यांनी शवविच्छेदन केल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. दरम्यान, मृत डाॅक्टरांच्या नाशिक येथील नातेवाइकांनी याबाबत काहीही जास्त बाेलण्यास असमर्थता दर्शविली.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10415,10410,10404″]

यासंदर्भात सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चेतन मोरे अधिक तपास करत आहेत.

आजारपणाला कंटाळून संपविले जीवन:
सुसाइड नोटमध्ये हे कृत्य आपण स्वतःच्या मर्जीने करत असून माझ्यावर कुठलाही दबाव नाही. पत्नीने आत्तापर्यंत खूप साथ दिली. आईवडिलांनी, भावाने काबाडकष्ट केले. मात्र, लिव्हरच्या आजाराने त्रस्त असल्याने मी आत्महत्या करत असून त्यास इतर कोणालाही जबाबदार धरू नये. मी माझे कर्तव्य पार पाडू शकलो नाही त्याबद्दल मला क्षमा करावी. लिव्हरच्या आजारामुळे आठ तास काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे सध्या नोकरी नाही. घरी बसलो तर लोकं नावं ठेवतील, आजारपणामुळे कर्ज झाले आहे. त्यामुळे अाता दुसरा काही पर्याय उरला नाही. असे डॉ. स्वप्नील पाटील यांनी सुसाइड नोटमध्ये लिहून ठेवले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790