नाशिककरांनो गोदावरी एक्स्प्रेसबाबत महत्वाची बातमी…
नाशिक (प्रतिनिधी): मध्य रेल्वेने ११ एप्रिलपासून गोदावरी एक्स्प्रेस कुर्लाऐवजी सीएसएमटीपर्यंत ११ एप्रिल ते १५ मेदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही गाडी सुरू करण्याचे आदेश मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातर्फे देण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार या हिरवा झेंडा दाखवतील.
तोट्यात असलेली व लॉकडाऊनमुळे बंद केलेली मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस चालू करावी यासाठी प्रवासी संघटना, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थ्यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना साकडे घातले होते.
[wpna_related_articles title=”More Important News” ids=”10389,10387,10383″]
त्याची दखल घेत डॉ. पवार यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेत गोदावरी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. गोदावरी एक्स्प्रेस ही गाडी १५ मेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन वर्षांपासून गोदावरी बंद असल्यामुळे नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत. इतर गाड्या सुरू झाल्या पण गोदावरी बंद करण्याचा निर्णय घेतला होता.
सुपरफास्ट समर स्पेशलचा दर्जा:
मनमाड ते सीएसएमटी सुपरफास्टला समर स्पेशल प्रवासी गाडीचा दर्जा देण्यात आला आहे. या गाडीला ११ कोच राहतील. ८ कोच जनरल राहणार आहेत. या समर स्पेशल ट्रेनला ३ रिझर्व्ह कोच राहणार असून त्यासाठी १० एप्रिलपासून बुकिंग सुरू होईल. मनमाडहून व सीएसएमटी येथून ११ एप्रिल ते १५ मे दरम्यानच्या जाऊन-येऊन फक्त ३५ फेऱ्यांसाठीच मंजुरी देण्यात आली आहे. मनमाडहून सकाळी ८.४५ वाजता निघेल. सीएसएमटीला दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी पोहोचेल. सायंकाळी सीएसएमटीहून पावणे चारला सुटणार आहे. मनमाडला रात्री साडेआठला पोहोचेल.