नंदिनीचे प्रदूषण रोखण्यास मदत होणार; दोंदे पुलावर २८ वर्षांनंतर उभारली संरक्षक जाळी
नाशिक (प्रतिनिधी): दोंदे पुलावर २८ वर्षांनंतर, तर सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळील पुलावर १२ वर्षांनी संरक्षक जाळी बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.
शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश आले आहे. नंदिनी नदीचे प्रदूषण यामुळे रोखले जाणार आहे.
परिसरातील रहिवाशांनी आणि शहरातील पर्यावरणप्रेमींकडून या कामाचे स्वागत केले जात आहे.
नाशिकच्या प्रभाग २४ मध्ये सिटी सेंटर मॉलच्या म्हसोबा मंदिराजवळ नंदिनी नदीवर पूर्वी छोटासा फरशी पूल होता. ऑगस्ट १९८८ मध्ये देवळालीचे तत्कालीन आमदार भिकचंद दोंदे हे मारुती कारसह पुरात वाहून गेले, त्यात त्यांचे दुर्दैवी निधन झाले. यानंतर सन १९९४ मध्ये येथे मोठा पूल बांधण्यात आला.
या पुलाला दोंदे पूल असे नाव पडले. गोविंदनगरकडे जाणार्या रस्त्यावर सिटी सेंटर मॉल सिग्नलजवळ महापालिकेने दुसरा पूल बांधला, २०११-१२ ला तो वाहतुकीसाठी खुला झाला. सिडको परिसरासह इतर नागरिक या दोन्ही पुलांवरून नंदिनी नदीत निर्माल्य, इतर घाण व कचरा टाकत असल्याने नंदिनीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत होते.
हे थांबण्यासाठी या पुलांवर पर्यावरण निधीतून संरक्षक जाळी बसविण्यात यावी, अशी मागणी नाशिक ‘सामना’चे पत्रकार, सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह कर्मयोगीनगर, उंटवाडी शिवसेना शाखा आणि रहिवाशांनी महापालिकेकडे केली. याबाबत ३१ मे २०२१ रोजी आयुक्त कैलास जाधव यांना निवेदनही दिले.
बाबासाहेब गायकवाड यांनी पाटबंधारे खात्याकडून महापालिकेला ना हरकत पत्रही मिळवून दिले. यानंतर पर्यावरण निधीतून आयुक्तांनी जाळी बसविण्यासाठी २५ लाख रुपये मंजूर केले. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांच्या हस्ते २३ ऑक्टोबर २०२१ रोजी या कामाचा शुभारंभ झाला. या दोन्ही पुलांवर संरक्षक जाळी बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. यामुळे येथून घाण, कचरा टाकण्याला प्रतिबंध बसला असून, नंदिनीचे प्रदूषण रोखण्याला मदत होणार आहे. पर्यावरणप्रेमी आणि नाशिककरांनी या कामाच्या पाठपुराव्याबद्दल बाबासाहेब गायकवाड (देशमुख), चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्यासह शिवसेना व सत्कार्य फाउंडेशनचे आभार मानले आहे.
सुशोभिकरण व्हावे, संरक्षक भिंत बांधावी – चारुशीला गायकवाड (देशमुख):
दोंदे पूल ते गोविंदनगर या भागात नंदिनी नदी किनारी संरक्षक भिंत बांधावी, सुशोभिकरण करावे, घाण-कचरा टाकण्यास प्रतिबंध यावा, संबंधितांवर कारवाई करता यावी यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, अशी मागणी महापालिका आणि स्मार्ट सिटीकडे करण्यात आली आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. महापालिकेकडून रोबोट मशीनने चर मोकळे केल्याने पाणी प्रवाहीत झाले आहे. नंदिनी नदीपात्र स्वच्छ झाले असून, दुर्गंधी कमी झाली आहे, अशी माहिती चारुशीला गायकवाड (देशमुख) यांनी दिली.