धक्कादायक: Loan App द्वारे आंध्रमध्ये ऑनलाईन फसवणूक; सिन्नरच्या तिघांना अटक…

धक्कादायक: लोन App द्वारे आंध्रमध्ये ऑनलाईन फसवणूक; सिन्नरच्या तिघांना अटक…

नाशिक (प्रतिनिधी): बँक खाते हॅक करण्याबरोबरच ऑनलाईन कर्जाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या सिन्नरच्या तिघांना आंध्र प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, संशयितांनी ऑनलाईन फसवणुकीसाठी शहरातील काही तरुणांच्या बँक खात्यांचा वापर करत कोट्यावधींची रक्कम ट्रान्सफर केल्याची चर्चा आहे.

त्यातून काही कोटी रुपयांचा गैरव्यवहार पुढे येण्याची शक्यता आहे…

सिन्नर शहरातील सॉफ्टवेअर तंत्रज्ञ अमित सुनील गवळी (वय ३१), हा या गुन्ह्यातील संशयित मास्टर माइंड असून त्याच्यासोबतच ज्यांच्या खात्यावर ही रक्कम मागवली गेली ते निलेश गोराडे (२९, रा. बारागाव पिंप्री), आणि सरफराज ऊर्फ बबलू अजीज शेख (वय: ३२, रा. सिन्नर) या तिघांना आंध्र प्रदेश पोलिसांनी सिन्नर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले आहे.

गुरुवारी दिवसभर त्यांची चौकशी आणि वैद्यकीय तपासणी करून कागदपत्रांची पूर्तता करत पणमालोरु (जि. कृष्णा, विजयवाडा, आंध्रप्रदेश) पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक अर्जुना रामू, हेडकॉन्स्तेबा रामचंद्र रात्री उशिरा संशयितांना घेऊन रवाना झाले.

सिन्नर शहरासह तालुक्यातील अनेकांना ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून गंडा घातल्याच्या घटना घडत असतांनाच आंध्र प्रदेशातील सायबर क्राईमशी थेट सिन्नरचे संबंध असल्याचे स्पष्ट होताच सगळे अवाक झाले.

काय आहे नक्की प्रकरण:
एका महिलेला लोन App च्या माध्यमातून नऊ हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. या कर्जाच्या वसुलीसाठी या महिलेला त्रास देण्यात येत होता. मॉर्फिंग करून न्यू ड फोटो पाठवून तिला ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्या बदल्यात तिच्याकडून काही लाखांची रक्कम वसूल करण्यात आली. बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँकेच्या खात्यावर काही रक्कम तिच्याकडून मागविण्यात आली. या प्रकाराने त्रस्त झालेल्या महिलेने २० जुलै २०२२ रोजी पनमालोरु पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अशाच एका प्रकरणात याच भागातील एका महिलेने आत्महत्या केल्याने आंध्र प्रदेश पोलिसांनी गुन्हेगारांचा छडा लावण्यासाठी तपासचक्र फिरवली. आणि त्याचे धागेदोरे थेट सिन्नरशी जोडले गेले. बुधवारी रात्री तीनही संशयितांच्या मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790