धक्कादायक: नाशिकला हुक्का पार्लरमध्ये पाण्याच्या ऐवजी मिळतेय चक्क बियर !
नाशिक (प्रतिनिधी): शहरात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असून हुक्का पार्लरमध्ये पाण्याच्या ऐवजी चक्क बियरचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक आरोप आ. देवयानी फरांदे यांनी गुरुवारी विधानसभेत केला.
नाशिकमध्ये व्यसनाबरोबरच गुन्हेगारी वाढली असून त्यावर चिंता व्यक्त करतांनाच कारवाईची मागणी फरांदे यांनी केली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी याबाबत शासनाने दाखल घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
भिवंडी येथून नाशिक शहर व मालेगावसाठी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे समोर येत आहे.
तसेच नाशिक शहरात हुक्का पार्लरदेखील सुरु आहेत. मखमलाबाद रस्त्यालगत व गंगापूर रोडवर काही हॉटेल व कॅफे हे अमली पदार्थांचे अड्डे झाले आहेत. पानटपरीवर अमली पदार्थ रात्री दोन वाजेपर्यंत खुलेआम विकले जात आहेत. हुक्का पार्लरदेखील सुरु असून सदर ठिकाणी पाण्याच्या ऐवजी बियरचा वापर केला जात असल्यामुळे नशा होत असते. असे नमूद करतांना शहरातील काही शाळांमधील मुले देखील व्यसनाधीन होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली. यापूर्वी देखील पोलीस प्रशासनाकडे तक्रार केली असतांना पोलीस प्रशासनाकडून याबाबत कारवाई झाली नसल्याचे आ. फरांदे यांनी सांगितले.