येत्या एक एप्रिल पासून UPI पेमेंट्सवर शुल्क लागणार असल्याचे आदेश समोर आल्यानंतर देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. देशात अनेकजण डिजीटल पेमेंट्सचा वापर करत असताना दुसरीकडे या व्यवहारावर चार्जेस लागू करण्यात आल्याने सामान्य ग्राहक खिशावर आणखी भार पडेल या चिंतेने पछाडला. आता, सरकारने यावर स्पष्टीकरण दिले असून सामान्य ग्राहकांनी चिंता करू नये असे आवाहन केले आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आपल्या परिपत्रकात 2000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी तुम्हाला 1.1% शुल्क आकारले जाईल, असे म्हटले आहे. UPI द्वारे व्यापारी व्यवहार (Merchant Transaction) प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPI) शुल्क लागू होणार आहे.
NPCI ने आपल्या परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की, या बदलाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. ग्राहकांना कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. बँक खात्यांशी जोडलेल्या UPI व्यवहारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ते पूर्वीप्रमाणे पूर्णपणे विनामूल्य आहेत. (UPI Payment remain Free) फक्त PPI वॉलेटवर शुल्क आकारले जाईल, जे व्यापाऱ्याला भरावे लागणार आहे. यासाठी ग्राहकांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
UPI पेमेंट्स महाग होणार?:
NPCI ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, व्यापारी UPI व्यवहारांवर हे शुल्क आकारले जाईल. म्हणजेच, बँका आणि प्रीपेड वॉलेटमधील पीअर टू पीअर (P2P) आणि पीअर टू मर्चंट (P2M) व्यवहारांवर हे शुल्क लागू होणार नाही. म्हणजे तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही काळजीशिवाय UPI वापरू शकता. तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. सोप्या भाषेत सांगायचे तर UPI पेमेंट पूर्णपणे मोफत आहे. तुमच्यासाठी, सामान्य ग्राहकांसाठी काहीही बदललेले नाही. UPI बँक हस्तांतरणामध्ये काहीही बदल झालेला नाही.
मग लागू झालेला चार्ज कोण भरणार?:
हा प्रस्ताव फक्त Wallets/PPI साठी आहे. म्हणजेच, जर तुम्ही वॉलेटमधून 2 हजारांपेक्षा जास्त व्यवहार केले तर तुम्हाला इंटरचेंज शुल्क आकारले जाऊ शकते, परंतु हे शुल्क व्यापाऱ्याकडून घेतले जाईल. म्हणजेच, जर तुम्ही वॉलेट, क्रेडिट कार्ड यांसारख्या प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (PPI) द्वारे UPI पेमेंट केले तर तुम्हाला इंटरचेंज फी भरावी लागेल. हे शुल्क तुम्ही व्यापाऱ्याला केलेल्या एकूण पेमेंटच्या 1.1 टक्के इतके असणार आहे. मात्र, हा व्यवहार 2000 रुपयांपेक्षा जास्त असेल तेव्हा शुल्क लागू होणार आहे. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डच्या बाबतीतही हेच आहे. बँक ते बँक व्यवहार अजूनही पूर्णपणे विनामूल्य आहेत.
हे शुल्क व्यापाऱ्याला द्यावे लागेल. येथे व्यापारी म्हणजे सोप्या भाषेत, दुकानदाराला शुल्क द्यावे लागणार आहे. ज्याला तुम्ही UPI द्वारे पैसे देणार आहात.
सामान्य लोकांवर काय होणार परिणाम?:
इंटरचेंज चार्ज आकारल्यास सर्वसामान्यांच्या खिशावर कोणताही परिणाम होणार नाही. इंटरचेंज शुल्क व्यापाऱ्याकडून वॉलेट किंवा कार्ड जारीकर्त्याला दिले जाते. अशा परिस्थितीत, 2000 रुपयांपेक्षा कमी पैसे देणाऱ्या व्यापाऱ्यावर त्याचा परिणाम होणार नाही.
कोणता पर्याय निवडायचा?:
NPCI ने आपल्या परिपत्रकात म्हटले आहे की बँक खाती आणि प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (PPIs) दरम्यान पीअर-टू-पीअर आणि पीअर-टू-पीअर-व्यापारी व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. परिपत्रकात, P2P, P2M व्यवहारांवर याची अंमलबजावणी करू नका, असे म्हटले आहे.
जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला किंवा दुकानदाराला पैसे दिले आणि पेमेंट पर्याय म्हणून बँक खाते निवडले, तर तुम्हाला शुल्क द्यावे लागणार नाही. म्हणजेच, कोणत्याही प्रकारचे शुल्क टाळण्यासाठी UPI पेमेंट करताना बँक खात्याचा पर्याय निवडणे चांगले राहिल असे सध्याच्या नियमांवरून दिसत आहे.
![]()


