नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाच्या विळख्यातून अनेक नागरिकांची सुटका झाली असली तरी, कोरोनामुक्त झाल्यानंतर देखील नागरिकांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या पुढे येत आहेत. त्याअनुषंगाने नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने कोविडकवच ॲप विकसित केले आहे. कोरोनामुक्त झालेले नागरिक त्यांच्या आरोग्यविषयक समस्या या ॲपवर मांडू शकतात.
व तज्ज्ञांकडुन त्यांना योग्य तो सल्ला देण्यात येणार आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना आरोग्यविषयक अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात रक्तामध्ये गुठळ्या होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, किडनीचे विकार, फुफ्फुसांचे विकार, हृदयरोग इत्यादी. यामुळे राज्य शासनाकडून रुग्णालयांमध्ये पोस्ट कोविड ओपीडी सुरू करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच कोविडकवच हे अॅप सुद्धा विकसित करण्यात आले आहे. या अॅपअंतर्गत कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना त्यांच्या समस्या मांडता येणार आहेत. व तज्ज्ञ व्यक्तींच्या माध्यमातून एसएमएसद्वारे त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. कोरोनामुक्त झालेला व्यक्ती त्याची त्यावेळेची आरोग्यविषयक माहिती तसेच सध्याची आरोग्यविषयक माहिती अॅपद्वारे भरून घेतली जाणार आहे.
त्यात इतर विविध आजारांची तीव्रता वाढली किंवा कमी झाली हे पाहण्यात येणार आहे. तसेच आरोग्यविषयक आणखी काही समस्या आहेत की नाही याबाबतची माहिती घेतली जाणार आहे. त्यासाठी प्रश्नावली देखील तयार करण्यात आली असून, मिळालेली माहिती संकलित करून करोनामुक्त व्यक्तीच्या आरोग्यविषयक अभ्यास केल्या जाणार आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री यांच्यामार्फत या अॅपचे लोकार्पण करण्यात आले.