नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर थंडीच्या वाढत्या लाटेत कोरोनाचीही दुसरी लाट येवू शकते, असा अंदाज तज्ञ व आरोग्य विषयक संस्थाकडून वर्तवला जात आहेत. परंतु नाशिक जिल्ह्यातील शासन-प्रशासन त्यासाठी सतर्क असून नागरीकांनीही त्यासाठी सतर्कता बाळगायची असून ही दिवाळी कोरोनामुक्त राहण्यासाठी ती फटाकेमुक्त राहून साजरी करावी असे आवाहन आज राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, नाशिक जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरतो आहे. 11 हजार च्या आसपास असलेली रुग्णसंख्या आज तीन हजारावर आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लाट आली, तरी आहे त्या क्षमतेसह जास्तीच्या क्षमतेने आपण सज्ज राण्याच्या सूचना सर्व संबंधीत यंत्रणांना देण्यात आल्या आहेत, असेही पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी सांगितले.
सद्यस्थितीमध्ये कोरोना चा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडे मास्क हेच सर्वात प्रभावी अस्त्र असल्यामुळे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर वचक राहील अशी कारवाई पोलिस व मनपा यांनी करण्यावर भर देण्यात यावा असेही त्यांनी सांगितले. आपल्या कारवाईतून बेफिकीरीने वागणाऱ्यांचे जबाबदारीने वागण्यासाठी मनपरिवर्तन होईल, अशी अपेक्षाही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केली.
सार्वजनिक ठिकाणी फटाके न फोडण्याचा व त्याचे प्रदूषण होणार नाही याबाबत जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आदेशाचे काटेकोर पालन नागरीकांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. फटाक्यांच्या प्रदुषणामुळे फुफ्फुसांवर विपरित परिणाम होवून त्यामुळे कोरोना रूग्ण व सर्वसामान्य नागरीक यांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू शकतो, त्यामुळे सर्वांनी कोरोनामुक्त राहण्यासाठी फटाकेमुक्त व प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करावी व सर्वांना ही दिवाळी आरोग्यदायी व समृद्धीची जावो यासाठी शुभेच्छा दिल्या.