कुत्र्याला गुंगीचं औषध देऊन सशस्त्र दरोडा, दिंडोरीच्या ढकांबे वस्तीवर 20 लाखांची जबरी लूट

कुत्र्याला गुंगीचं औषध देऊन दरोडा टाकला, दिंडोरीच्या ढकांबे वस्तीवर 20 लाखांची जबरी लूट

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी तालुक्यातील ढकांबे येथे शनिवारी (ता. १२) पहाटे दीड-दोन वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत २८ तोळे सोन्यांसह साडे आठ लाखांची रोकड असा १७ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. घटनेची माहिती कळता पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासासाठी पथके दरोडेखोरांच्या मागावर रवाना करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ढकांबे येथील रतन शिवाजी बोडके यांचा मानोरी शिवारात शिवकथल नावाचा दोन मजली बंगला आहे. शनिवारी (ता. १२) पहाटे दीड ते दोन वाजेच्या सुमारास बोडके यांच्या बंगल्यावर अज्ञात पाच ते सहा जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने सशस्त्र दरोडा टाकला. संशयितांकडे पिस्तुल, चाकू अशी हत्यारे होती.

दरोडेखोरांनी लहान मुलांवर पिस्तुल व चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली आणि घरातून २८ तोळे सोने, ४८० ग्रॅम चांदी आणि ८ लाख ५० हजारांची रोकड असा सुमारे १७ लाख ३४ हजारांचा ऐवज घेऊन, बोडके यांचया क्रेटा कारमधून दरोडेखोरांनी पोबारा केला. दरोडेखोरांनी बंगल्यात शिरण्यापूर्वी बोडके यांच्या पाळीव कुत्र्याला गुंगीचे औषध दिल्याचे समोर आले आहे.

दरोड्याची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्यासह अपर अधीक्षक माधुरी कांगणे, कळवणचे उपविभागीय अधिकारी भोसले, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह दिंडोरीचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी धाव घेतली. दरोडेखोरांनी घरातील सामान अस्तव्यस्थ केले होते. तर, दरोडेखोरांनी चोरून नेलेली क्रेटा कार ढकांबे फाट्यावरील वाडा हॉटेलजवळ आढळून आली.

पोलिसांची शोध पथके तयार करून संशयित दरोडेखोरांच्या मागावर रवाना करण्यात आली आहेत. फिंगर प्रिंट ब्युरो, डॉग युनिट, तांत्रिक विश्लेषण शाखा अशा तपास यंत्रना घटनास्थळी दाखल झाल्या असून शोध दरोडेखोरांना माग काढण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. याप्रकरणी दिंडोरी पोलीसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ग्रामीण पोलिसांसमोर आव्हान:
ऐन दिवाळीत नाशिक-पुणे रोडवरील नांदूर शिंगोटे येथे दरोड्याची घटना घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हेशाखा पोलिसांनी उकल करीत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली. या गुन्ह्याची उकल करून २४ तास होत नाही तोच, दिंडोरीतील ढकांबे येथील सशस्त्र दरोड्याची घटना घडली. त्यामुळे ग्रामीण पोलिसांसमोर दरोडेखोरांच्या टोळीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790