नाशिक (प्रतिनिधी): निफाड तालुक्यातील कारसूळ येथील तरुणी दीपिका ताकाटे हिचा मृतदेह आहेरगाव येथील डाव्या कालव्यात सापडल्यानंतर हे प्रकरण आत्महत्येचे नसून मैत्रीच्या संबंधातील वादातून तिची हत्या झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पिंपळगाव पोलिसांनी ४८ तासांत संशयित विक्रम गोपीनाथ ताकाटे व सोमनाथ दत्तात्रय निफाडे यांच्यावर हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारसूळ येथील तरुणी दीपिका अजय ताकाटे ही सोमवारी (दि. १५) पिंपळगाव महाविद्यालयास गेली. मात्र, सायंकाळ झाली तरी घरी न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नव्हती. मंगळवारी (दि. १६) दीपिकाचा मृतदेह आहेरगाव येथील पालखेड डाव्या कालव्यात सापडल्यानंतर तिने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त होत होता. मात्र, पोलिसांनी तपास केल्यानंतर तिच्याच नात्यातला विक्रम गोपीनाथ ताकाटे व त्याचा मित्र सोमनाथ दत्तात्रय निफाडे या दोघा संशयितांनी तिची हत्या केल्याचे समोर आले.
दीपिका व विक्रम यांचे मैत्रीचे संबंध होते. विक्रम व दीपिकामध्ये वाद झाल्याने सोमवारी विक्रमने दीपिकाला पिकअपमध्ये सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर नेले. त्यानंतर सायंकाळी ५:३० च्या दरम्यान मित्राच्या सहाय्याने ओढणीने तिचा गळा आवळला. मात्र, तरीही ती जीवंत असल्याने लक्षात आल्याने दोघा संशयितांनी गाडीतील दोरीने पुन्हा तिचा गळा आवळला. त्यानंतर तिचा मृतदेह पिकअपमध्ये टाकत रात्री १.३० च्या सुमारास आहेरगाव येथील पालखेड डाव्या कालव्यात फेकला.
सकाळी कालव्याचे पाणी कमी झाल्याने स्थानिकांना तिचा मृतदेह मिळून आल्याने त्यांनी तात्काळ पिंपळगाव पोलिसांत याची माहिती दिली. पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी या प्रकरणात तपास करून दोघा संशयितांना ४८ तासांत अटक केली. असून त्यांच्यावर हत्याकरून पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.