कसारा घाटातील ब्रिटिशकालीन बोगदा खुला! वाहनचालकांचा 12 Kmचा फेरा अन वेळही वाचणार

नाशिक (प्रतिनिधी): जव्हार, मोखाडा, खोडाळा, विहिगावसह १२ गाव पाड्यातील चाकरमानी, ग्रामस्थ व वाहन चालकांना आता ब्रिटिशकालीन बोगद्यातून थेट नवीन कसारा घाटमार्गे कसारा, कल्याणकडे जाण्यासाठी रस्ता खुला करण्यात आला आहे.

त्यामुळे अनेक वर्षांपासून जीव मुठीत घेऊन प्रवास करणाऱ्या गोर गरीब आदिवासी बांधवांचा प्रवास आता सुखकर झाला आहे.

जव्हार फाट्याहून कसाराकडे लोकल पकडण्यासाठी, बाजारहाट, येण्या -जाण्यासाठी किंवा मुबई ठाणे येथे कामधंद्यासाठी अनेक ग्रामस्थ चाकर मानी, दुचाकी, एस टी बससह खासगी वाहनांनी कसारा येथे जातात.

तिथून लोकलने पुढील प्रवास करतात. परंतु हा प्रवास करताना हे वाहतूकदार, वाहन चालक जव्हार फाटामार्गे मुंबई नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटातून विरुद्ध बाजूने दोन किलोमीटरचा प्रवास करून कसाराकडे जाणाऱ्या नाशिक मुंबई लेनवर यायचे.

परिणामी या राँग साइड प्रवासामुळे अनेक अपघात जव्हार फाटा ते आंबा पॉइंट या दरम्यान होत होते. या प्रकरणी महामार्ग पोलिस घोटी केंद्राचे अधिकारी अमोल वालझडे यांनी पर्यायी रस्त्यासाठी वनविभाग यांच्याकडे मृतावस्थेत असलेल्या ब्रिटिश काळातील बोगदाबाबत चर्चा करून पाहणी केली.

दरम्यान जव्हारफाट्या लागतच असलेला बोगदा थेट नवीन घाटात उतरत असल्याचे निदर्शनात आले. दरम्यान तिन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या बोगद्यातील रस्त्याची दुरुस्ती करून तात्पुरत्या स्वरूपात जव्हार फाट्याहून कसाराकडे येणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ता खुला केला.

परिणामी वाहनचालकांचा १२ किलो मीटरचा फेरा आणि वेळही वाचणार आहे. तसेच भविष्यात कसारा घाटात काही आपत्ती उद्भवली तर हा पर्यायी मार्ग नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यामुळे इगतपुरी, कसारा व जव्हार येथील प्रवासी वर्गाने समाधान मानले.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790