नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील महात्मा गांधी रोडवरील श्याम सिल्क अँड सारीज या कापड दुकानाला रात्री आग लागली. दरम्यान, दीड तासाच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
रविवारी (दि.१७ जानेवारी) रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास कापड दुकानाला भीषण आग लागली. त्यानंतर, धूर येत असल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने भद्रकाली पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाला याची माहिती देताच, काही वेळात अग्निशमन पथक घटनास्थळी पोहचले. दरम्यान, दुकान उघडण्यात आले असून,दुकानात मोठ्या प्रमाणात आगीचे लोट व धूर साचलेला होता. पथकाच्या अथक परिश्रमानंतर अवघ्या दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले.
मात्र, या आगीत अनेक फॅन्सी साड्या, वातानुकूलित यंत्रे व फर्निचर जळून खाक झाले असून, ४० लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. वेळ रात्रीची असल्याने दुकानात कोणीच नसल्याने जीवितहानी झाली नाही.