नाशिक (प्रतिनिधी) : रिझर्व्ह बँकेकडून एचडीएफसी बँकेच्या प्रणालीदोष, डिजिटल सेवा केंद्रात अनियमितता या कारणांवरून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यानुसार एचडीएफसीला डिजिटल सेवा व नवीन क्रेडिट कार्ड देण्यास मनाई करण्यात आली आहे.
एचडीएफसी बँक ही देशामधील सर्वात मोठी खासगी बँक असून, या बँकवर तात्पुरत्या स्वरूपाची डिजिटल व्यवहारबंदीची कारवाई रिझर्व्ह बँकेकडून बुधवारी (दि.०२) करण्यात आली आहे. यामुळे बँकिंग क्षेत्रात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मागील २ वर्षांपासून, एचडीएफसी बँकेच्या डिजिटल प्रणालीमध्ये दोष असल्याने ग्राहकांना याचा मोठा फटका बसत आहे, असा संदर्भ रिझर्व्ह बँकेने दिला आहे.
तर दुसऱ्या बाजूला एचडीफसीने देखील काही काळासाठी निर्बंध लादले असल्याने डिजिटल बँकिंग चॅनल ज्यामध्ये इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग व अन्य सेवेचा समावेश आहे, ते चॅनल बंद आहे, असे मुंबई व राष्ट्रीय शेअर बाजाराला सांगितले आहे. २ वर्षांपूर्वी डिसेंबर २०१८ मध्ये एचडीएफसीने नवे मोबाईल ऍप सुरु केले होते. मात्र, अवघ्या काही तासातच ते ऍप क्रॅश झाले. तसेच २०१९ मध्ये वेतन वितरणादरम्यान ऑनलाईन चॅनल बंद पडले. तर २१ नोव्हेंबर रोजी बँकेच्या प्राथमिक डेटा सेंटरमध्ये विद्युत पुरवठा बंद पडला. अशा कारणांमुळे अखेर रिझर्व्ह बँकेकडून पावले उचलत कारवाई करण्यात आली.