नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू असताना अचानक व्यापारी वर्गाच्या पत्राने सोमवारी कांदा लिलाव बंद करण्यात आला. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून राग व्यक्त केला जात आहे. तरी कांदा लिलाव सुरळीत करण्यासाठी सर्व बाजार समित्यांना पत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी दिली आहे.
परतीच्या पावसाने मोठ्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. आर्थिक ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला कांद्याने आसरा दिला असता मात्र, कांद्याचे दर नियंत्रणात करण्यासाठी व्यापाऱ्यांच्या कांदा साठवणुकीवर मर्यादा घातल्याने कांदा खरेदी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात १५ कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत. सोमवारी (दि.२६) सर्व बाजार समिती सुरू होत्या. मात्र, कांदा आवक झाली नाही किंवा अल्प प्रमाणात झाल्याने लिलावाचे कामकाज झाले नाही.
केंद्र शासनाने व्यापाऱ्यांवर साठवणुकीच्या संदर्भात निर्बंध लादले आहेत. बऱ्याच व्यापाऱ्यांकडे जुना माल आहे. तरी नव्याने माल खरेदी केला तर साठवणूक नियमांचे उल्लंघन होण्याचा धोका असल्याने जुन्या मालाची विल्हेवाट लागेपर्यंत लिलावात सहभागी होणार नसल्याचे पत्र व्यापारी संघटनांनी बाजार समित्यांना दिले. त्यामुळे या ठिकाणी कांदा लिलाव करण्यात आला नाही. व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार बाजार समित्यांना आहे. तरी त्यांनी लिलाव सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावे. त्यासंदर्भात सूचना देण्यात आल्याचे खरे यांनी सांगितले.