नाशिक (प्रतिनिधी) : शहरात पूर्वीच्या तुलनेत कोरोनाबाधितांचा तसेच मृतांचा आकडा कमी होत असल्याने ही बाब दिलासादायक आहे. मात्र, ज्या आरोग्य यंत्रणेवर जबाबदारी, तसेच नागरिकांचा विश्वास आहे. त्याच यंत्रणेकडून, मोठा निष्काळजीपणा झाल्याचे उघड झाले असून, रविवारी जाहीर करण्यात आलेला कोरोना मृतांचा शून्य नव्हता तर रविवारी कोरोनामुळे ३ मृत्यू झाले होते असे स्पष्ट झाले आहे.
रविवारी (दि. १ नोव्हेंबर) रोजी कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून जाहीर करण्यात आली होती. मात्र, रविवारी मृतांचा आकडा ३ असून, हि माहिती यंत्रणेने जाहीर केली नाही. याबाबत निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल वेळेवर न मिळाल्याने आकडे जाहीर करता आले नाही असे, स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोनाच्या पार्श्वभूमीचे सकारात्क चित्र शहरात दिसू लागले असून, कोरोनाबाधितांचा व मृतांचा आकडा कमी होत आहे, म्हणून यासंदर्भात आरोग्य यंत्रणेचे सर्वत्र कौतुक केले जात होते.
मात्र, यंत्रणेचा हा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. रविवारी शहरामध्ये जिल्हा रुग्णालयात २ महिलांचा तर, खासगी रुग्णालयात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या मृतांचा अंत्यविधी करण्यात आला. दरम्यान अहवालात संबंधित व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट नमूद केले होते. तरी देखील जिल्हा रुग्णालयाकडून, देण्यात येणाऱ्या अहवालात मात्र या रुग्णांचा कुठेही उल्लेख आढळुन आला नाही. परंतु, रविवारी आकडा मात्र शून्य जाहीर करण्यात आला. यावर निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद पवार यांनी रुग्णालयाकडून मृत्यूचा अहवाल प्राप्त झाला नसल्याने व ऑनलाइन पोर्टलवर समरी भरली नाही म्हणून आकडा जाहीर केला नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.