नाशिक (प्रतिनिधी): आनंदवली येथील राहणारे रमेश वाळू मंडलिक (७५) यांच्या खूनप्रकरणी गंगापूर पोलिसांनी रम्मी राजपूतसह ११ संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. जमिनीच्या वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बुधवारी (दि. १७) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला होता.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि विशाल रमेश मंडलिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, वडील शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांना अनोळखी व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार करून जिवे ठार केले. या प्रकरणात नातेवाइक संशयित सचिन त्र्यंबक मंडलिक, जगदीश त्र्यंबक मंडलिक, अक्षय ऊर्फ अतुल जयराम मंडलिक, मुक्ता एकनाथ मोटकरी, भूषण भीमराव मोटकरी, सोमनाथ काशीनाथ मंडलिक, दतात्रेय काशीनाथ मंडलिक, नितीन खैरे, आबाजी पाराजी भडांगे, भगवान चांगले आणि रम्मी राजपूत यांच्यावर संशय व्यक्त केला आहे. गंगापूर पोलिसांनी वरील संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून यातील नऊ संशयितांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ निरीक्षक अंचल मुदगल तपास करीत आहेत.
आनंदवली खूनप्रकरणी नऊ संशयितांना अटक करण्यात आली असून, या संशयितांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवस (दि. २४) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
बांधकाम व्यावसायिकास अटक
आनंदवली येथील रमेश मंडलिक खूनप्रकरणी संशयित बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब कोल्हे यांचे नाव तक्रारदारांनी दिले असून, कोल्हे यांनी जमीन वादात मध्यस्थी करत जमीन विक्री करण्यास दबाव आणला असल्याचा आरोप मृताच्या मुलाने केला आहे. गंगापूर पोलिसांनी संशयित कोल्हे यांना अटक केली असल्याच्या माहितीस उपआयुक्त अमोल तांबे यांनी दुजोरा दिला आहे.