आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांचे मिशन नाशिक !
जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आता अनेक पक्षाच्या नेत्यांबरोबरच, पक्षाचे प्रमुख नेत्यांनी आता नाशिककडे आपले लक्ष केंद्रित केले आहेत.. शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पाठोपाठ आता मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत..
आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील आता नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. अवघ्या काही महिन्यांवर येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांमुळे आता राजकीय पक्षाचे नेते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. उद्यापासून (दि. १६ जुलै) मनसे प्रमुख राज ठाकरे तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. या दौर्यात शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबतच कार्यकर्त्यांशी देखील ते चर्चा करून आढावा घेणार असल्याची माहिती आहे.
कधी काळी नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला मानला जात होता; मात्र मध्यंतरीच्या काळात नाशिकमध्ये मनसेला गळती लागली. त्यामुळेच पक्षाची सध्या काही प्रमाणात वाताहातही झाली आहे. पक्षात आलेली मरगळ दूर करण्याचा प्रयत्न मनसे प्रमुख राज ठाकरे आपल्या या दौर्यात करणार आहेत. तर दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील शनिवार आणि रविवार दोन दिवसीय नाशिक दौरा करून पक्षाचा आढावा घेणार आहेत.
सध्या नाशिक मनपात भाजपाची एकहाती सत्ता आहे. मात्र सध्या पक्षात गटतट निर्माण झाल्याने काहीशी नाराजी देखील आहे. याच संदर्भात चंद्रकांत पाटील आपल्या या दौऱ्यात आढावा घेत गट तट संपवून पुन्हा एकदा एकत्र मिळून कामाला लागण्याचे संदेश देऊ शकतात. त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या या दौऱ्याकडे विशेष लक्ष लागले आहे..!