नाशिक (प्रतिनिधी) : म्हसरूळ येथील गणेशवाडी परिसरातील अमरधाम रस्त्यालगत असलेल्या हरिकृष्ण सोसायटीजवळ अर्धवट तुटलेली भिंत एका तरुणाच्या पायावर कोसळली. जखमी झालेल्या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला.
शुभम प्रकाश सूर्यवंशी हे मयत तरुणाचे नाव असून, हा राहत असलेल्या इमारतीजवळच पाणीपुरवठ्याचे काम सुरु आहे. हे काम सुरु असतानाच भिंत अर्धवट तुटल्याची माहिती नागरिकांनी दिली. हीच भिंत बुधवारी (दि. २ डिसेंबर) रोजी शुभमच्या पायावर कोसळली. या अपघातात तो जखमी झाला असून, त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. दरम्यान, गुरुवारी (दि.३ डिसेंबर) रोजी उपचार सुरु असतांना शुभमचा मृत्यू झाला. या घटनेने संबंधित परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शुभमची आई नसल्याने त्याचा सांभाळ त्याच्या आत्याने केला. शुभमला एक बहीण आहे तर, शुभमचे वडील गॅरेजमध्ये काम करून, कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यामुळे दहावीपासूनच, शुभमदेखील मिळेल ते काम करून, आपल्या परिवाराला हातभार लावायचा. अशा या अतिशय कष्टाळू मुलाचा ऐन तारुण्यात मृत्यू झाल्याने सूर्यवंशी कुटुंबावर दुःखाचे मोठे संकट कोसळले आहे.