अबब: तब्बल ३३ लाख रुपयांचा गुटखा पकडला; दोघांना अटक
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात अवैध मार्गाने येणारा गुजरात निर्मित गुटखा जप्त करण्यात आला आहे.
सुरगाणा पोलिसांनी गुजरात राज्याच्या सीमेलगत ठाणपाडा शिवारात सापुतारा ते नाशिक मार्गावर संशयित ट्रक पकडला.
ट्रकमधून ३३ लाख ७६ हजारांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी संदीप मुंजेभाऊ गायकवाड (रा. मखमलाबाद), कुणाल संजय मेणे (रा. खर्डे, ता. देवळा) या दोघांना सुरगाणा पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, सुरगाणा हद्दीतून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सुरगाणा पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. पथकाने ठाणापाडा शिवारात सापुतारा-नाशिक महामार्गावर संशयित ट्रक (एमएच १५ एचएच २४१६) थांबवला. चालकाकडे गाडीमधील मालाची विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. ट्रकमधील गोण्या फोडून पाहिल्या असत्या त्यात २३ लाख ७६ हजारांचा गुटखा आढळून आला. पाेलिस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संदीप कोळी, सहायक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.