प्रा.दत्ता निंबाळकर, भोंसला मिलीटरी कॉलेज,नाशिक
दिनांक १४ जून रोजी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारताच्या तिन्ही सेना प्रमुखांसोबत देशाच्या तरुणांसाठी सैन्यदलात भरती होण्यासाठी “अग्निपथ ” नावाची नवीन योजना जाहीर केली. अग्निपथ हि योजना भारतीय सैन्यमध्ये फार मोठे आमूलाग्र बदल घडून आणणार आहे.
देशात स्वातंत्र्य पासून चालत आलेली सैन्य भरती प्रक्रिया बंद होऊन अग्निपथ हि योजना लागू होणार आहे. “अग्निपथ ” योजनेअंतर्गत या वर्षी ९० दिवसांच्या आत भारतीय भूदल, नौदल व वायुदलात जवानांची भरती प्रक्रियेस सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. मात्र सरकारच्या या योजनेवर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. “अग्निपथ ” योजनेबद्दल देशात दोन प्रकारचे मतप्रवाह आपणास दिसतात. पहिला म्हणजे जे या योजनेला समर्थन देऊन याचा देशाला कसा फायदा होईल हे पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत तर दुसरा म्हणजे जे या योजनेला विरोध करत असून ती कशी देश्याच्या सरंक्षण सिद्धतेवर परिणाम करेल हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यात प्रामुख्याने विरोध पक्ष्य, देशातील युवक तसेच काही निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा पण समावेश आहे.
युवकांनी देशभर या योजने विरोधात जोरदार प्रदर्शने सुरु केली आहे काही ठिकाणी तर प्रदर्शनांनी हिंसक वळण घेतलेले असून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान करण्यात आलेले आहे. या लेखात आपण हि योजना नेमकी काय आहे? सरकारने हि योजना का आणली? योजनेचे फायदे काय आहे? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.
योजना नेमकी काय आहे?:
अग्निपथ योजनेमध्ये भरती झालेल्या सैनिकांना अग्निवीर असे संबोधले जाईल. अग्निविरांना चार वर्षाच्या कालावधीसाठी संबधीत सेवा कायद्याअंतर्गत सुरक्षा दलात दाखल केले जाईल यात वयाची मर्यादा १७.५ ते २१ आहे. पहिल्या वर्षी अग्निविराना रु ४ लाख ७६ हजाराचे वार्षिक पॅकेज असेल नंतर ते ६ लाख ९२ हजार वार्षिक पॅकेज पर्यंत वाढवले जाईल. अग्निपथ योजनेत भरती होणाऱ्या ७५% अग्निविराना निवृत्ती दिली जाईल व सोबत रु ११. ७१ लाखाचा सेवा निधी दिला जाईल तर २५% अग्निविराना कायमस्वरूपी करण्यात येईल, कायमस्वरूपी केलेल्या अग्निविराना किमान १५ वर्ष सेवा देणे आवश्यक आहे.तसेच निवृत्ती सोबत अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र दिले जाईल जे त्यांना पुढील नोकरी मिळवण्यास मदत करेल.
चार वर्षाच्या सेवा काळात काही वैधकीय समश्या उद्भवल्यास रु ४८ लाखाचे विना सहयोगी जीवन विम्याचे सरंक्षण अग्निविराना देण्यात आलेले आहेत.
अग्निपथ योजनेचे फायदे ?:
अग्निपथ योजनेमुळे अग्निवीरांनमध्ये लष्करी कौश्यल्य, शिस्त, अनुभव, शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्व कौशल्य, राष्ट्रप्रेम व राष्ट्रभक्ती यासारखी मूल्ये रुजवली जातील. चार वर्षानंतर अग्निवीर या मूल्यांसोबत समाजात एक आदर्श व सृजन नागरिक म्हणून कार्यरत राहील. प्रत्येक अग्निविराचे कौश्यल्य प्रमाणपत्र असेल जे त्याला पुढील नोकरी मिळविण्यासाठी मदत करेल, तसेच ११. ७१ लाखाचा सेवा निधीचा उपयोग करून अग्निवीर उद्योग सुरु करू शकतात. अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर देशात बऱ्याच ठिकाणी प्रदर्शने सुरु झाले काही ठिकाणी तर प्रदर्शनांनी हिंसक वळण घेतले त्यानंतर सरकारने अग्निपथ योजनेमध्ये काही बदलाव करत नवीन बाबींचा समावेश केला. १) या वर्षाच्या भरतीप्रक्रियेमध्ये वयोमर्यादा १७.५ ते २३ अशी करण्यात आलेले आहे. २) अग्निवीरांना बँक मधून कर्ज घेण्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. ३) १०% जागा केंद्रीय पोलीस दल व १०% जागा संरक्षण मंत्रालयात राखीव करण्यात येतील.
अग्निपथ योजना का आणली ?:
७५ वर्षांपासून चालत आलेली भरती प्रक्रिया बंद करून सरकारने अग्निपथ योजना का आणली असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर यामागे मुख्य तीन कारणे आपल्याला दिसतात..
१- भारताचा एकूण संरक्षण बजेटचा ५४% खर्च हा पगार व निवृत्तीवेतन या गोष्टींवर खर्च होतो तो कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
२- भारतीय सैन्यातील सैनिकांचे सरासरी वय हे ३२ वर्ष इतके आहे तर ते २६ वर्ष इतके करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे ज्यामुळे भारतीय सेनेत जास्तीत जास्त युवांचा समावेश असेल.
३- पगार व निवृत्तीवेतन यांच्यावर होणारा ५४% खर्च कमी करून तो सैन्याच्या आधुनिकीकरणावर खर्च केला जाईल ज्यामुळे सैन्याला लागणारे रणगाडे, बंदुका, लढाऊ विमाने व हेलीकॉप्टर यासारखे आधुनिक हत्यारे खरेदी करता येतील.
कोणत्याही देशात पूर्वीपासून चालत आलेली व्यवस्था जेव्हा बदलून नवीन व्यवस्था आमलात आणण्याचा प्रयत्न केला जातो त्यावेळेस त्याला विरोध होणे स्वाभाविक आहे. १९८६ मध्ये तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी अमेरिकन सैन्य व्यवस्थेत फार मोठे बदल करण्याच्या प्रयत्न केला होता तेव्हा खूप अमेरिकन नागरिक व सैन्य अधिकाऱ्यांनी याला विरोध केला परंतु आज त्याच बदलावामुळे अमेरिकन सैन्यमध्ये सुसूत्रता, समन्वय निर्माण झाला नंतर हे बदलाव बऱ्याच देशांनी स्वीकारले याला गोल्ड वॉटर निकोलस ऍक्ट म्हणतात.
मी इथे अग्निपथ योजनेची तुलना अमेरिकेने केलेल्या सैन्य बदलावासोबत करत नाही पण कोणतेही बदलाव केल्यानंतर त्याला विरोध हा होतोच परंतु कालांतराने त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसतात. म्हणून अग्निपथ योजनेला होणार विरोध हा फार काही काळ चालणार नाही येणाऱ्या काळात याचे चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील. त्यामुळे युवकांना देशसेवेत सहभागी होण्याची उत्तम संधी आहे, या योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी फायदा घेऊन देश सेवा करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करावं..!
14 Total Views , 1 Views Today