नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील डिसूजा कॉलनी येथे शनिवारी एका अज्ञात इसमाने वृक्षतोड केली होती. दरम्यान, हे कृत्य सी.सी.टी. कॅमेरामध्ये चित्रित झाले होते. याचं फुटेज देखील ‘नाशिक कॉलिंग’ कडून प्रसारित करण्यात आला होता. अज्ञात इसमाने वृक्षतोड केल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत होता. परंतु, अखेर त्या संशयितांवर गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी किरण गणेश बोडके (वय ३२) हे राजेंद्र नगर को-ऑप. सोसायटी गणेशवाडी रोड पंचवटी परिसरात राहतात. मेघा सोसायटी, गजानन जनार्दन म्हात्रे मार्ग डिसूजा कॉलनी येथे सार्वजनिक रस्त्यालगत महापालिका नाशिक यांची सार्वजनिक मालमत्ता आहे. दरम्यान, शनिवारी (१६ जानेवारी) रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास एका अज्ञात इसमाने महापालिका नाशिक यांच्या मालमत्तेतील एक आंब्याचे ४० ते ४५ फूट उंचीचे झाड तोडले. तसेच संमतीशिवाय लबाडीच्या हेतूने हे झाड तोडून नुकसान केल्यामुळे संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ४ दिवसानंतर उशिरा का होईना अखेर गुन्हा दाखल झाला आहे.