नाशिक (प्रतिनिधी): रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ७० हजारांची लाच मागणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभाग सहायक अभियंता गंगाराम सीताराम भोये याच्या विरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी (दि.१) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही तक्रार दिली. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, भोये यांनी सुरगाणा तालुक्यातील बाऱ्हे गावात केलेल्या रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून देण्यासाठी ७० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली होती. त्यानंतर पथकाने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात सापळा रचला. फिर्यादीकडून पंचासमक्ष ७० हजारांच्या लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले. मुंबई नाका पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गंगाराम भोये याला २००९ मध्येही १० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. कळवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.