नाशिक: ५९ वर्षीय प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले; घरही पेटले

नाशिक: ५९ वर्षीय प्रियकराने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवले; घरही पेटले

नाशिक (प्रतिनिधी): प्रेमप्रकरणातून वाद झाल्याने प्रेयसीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला प्रियकराने पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. १०) दुपारी एकच्या सुमारास पंचवटीतील शिंदेनगरात घडला. पीडित महिलेच्या मोठ्या बहिणीच्या घरात हा प्रकार घडला.

घटनेनंतर आग पसरून फ्लॅटमधील संसारोपोयोगी वस्तू खाक झाल्या. सुदैवाने पीडितेचे सासरे, मोठी बहीण व दोन नातू यांनी आरडाओरड केल्याने नागरिकांनी धाव घेत मदत केली. काही वेळातच अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आली व पुढील मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी पोलिसांनी ५९ वर्षीय प्रियकराला अटक केली आहे.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित महिला (५८, रा. शिंदेनगर, पंचवटी) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार संशयित रिक्षाचालक सुखदेव गुलाब माच्छेवाल ऊर्फ कुमावत (५९, रा. कुमावतनगर) याच्यासोबत या महिलेची ओळख आहे. अगरबत्ती विक्रीचा व्यवसाय असल्याने नेहमी कुमावतच्या रिक्षामधून पीडिता प्रवास करत असल्याने त्यातून प्रेमसंबंध निर्माण झाले. मंगळवारी दुपारी ती शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या मोठ्या बहिणीकडे (६१, रा. शिंदेनगर) गेली असता संशयित तेथे आला.

त्याच्या हातात पेट्रोल भरलेल्या दोन बाटल्या होत्या. ‘तुझ्याशी बोलायचे आहे, खाली चल’ असे तो म्हणाला. त्यास नकार दिल्यानंतर संशयिताने शिवीगाळ करत मारहाण केली. बाटलीतील पेट्रोल अंगावर टाकले. यावेळी दुसऱ्या बाटलीतील पेट्रोल घरात पडले. खिशातून आगपेटी काढून आग लावून तो पळून गेला. यामध्ये पीडिता गंभीर भाजली. तिला वाचविताना मोठ्या बहिणीचे हात-पाय भाजले. हॉलमध्ये आग पसरल्यानंतर मोठ्या बहिणीचे वृद्ध सासरे आणि दोन नातू आगीपासून बचाव करण्यासाठी बेडरूममध्ये ले एव तेथील खिडकीतून आरडाओरड करत मदत मागितली. इमारतीमधील रहिवाशांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी मदतीसाठी धाव घेतली. काही वेळातच अग्निशमन बंबही दाखल झाले. अग्निशमन जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत फ्लॅटमध्ये अडकून पडलेल्या वृद्ध आणि दोन लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले.

हे ही वाचा:  नाशिक: अज्ञात वाहनाच्या धडकेत ५८ वर्षीय पादचारी ठार

गंभीर भाजलेली पीडिता व तिच्या बहिणीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यात पीडितेची प्रकृती गंभीर असून तिच्या मोठ्या बहिणीचे हात-पाय भाजल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस दाखल झाले. मुलांकडून माहिती घेऊन संशयिताचा माग काढला. त्याला दिंडोरी येथील लखमापूर फाटा येथे अटक केली.

घरातील इतर सदस्य बाहेर असल्याने बचावले:
या घरात पीडितेच्या बहिणीचे सासरे, दोन मुले, सुना, नातवंडे असे दहा सदस्य राहतात. घटनेच्या वेळी घरात या महिलेसह तिचे सासरे आणि ३ आणि १० वर्षांचे दोन नातवंडे होते. कुटुंबातील इतर सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. आग लागल्याने फ्लॅटमधील हॉल, सोफा, टीव्ही आणि इतर संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790