Breaking: ४३ लाखाच्या लाचेची मागणी, साडे तीन लाख स्विकारतांना रंगेहाथ अटक

नाशिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Breaking: ४३ लाखाच्या लाचेची मागणी, साडे तीन लाख स्विकारतांना रंगेहाथ अटक

नाशिक (प्रतिनिधी): ठेकेदाराच्या ३ कोटी ९२ लाख ७९ हजार २८५ रुपये बिलाची प्रलंबित रक्कम काढणे तसेच प्रस्तावित असलेल्या तीन कामांच्या ५ कोटी ३३ लाख रुपये एवढ्या रकमेचे कार्यारंभ आदेश मिळण्यासाठी शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील याने संबंधीत ठेकेदाराकडून ४३ लाख रुपये लाचेची मागणी केली होती.

त्यापैकी साडे तीन लाख रुपये लाचेची रक्कम स्विकारतांना या कार्यकारी अभियंत्याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास त्याच्या शासकीय निवासस्थानी ही कारवाई केली.

यातील तक्रारदार हे शासकीय नोंदणीकृत बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी गेल्या एक वर्षाच्या कालावधीत नंदुरबार जिल्ह्यात प्रमुख जिल्हा मार्ग, प्रमुख राज्य मार्ग अशा विविध रस्त्यांच्या नवीन डांबरीकरणाची कामे पूर्ण केली आहेत.

तसेच सदर ठेकेदाराला तीन नवीन कामांच्या निविदा मंजूर झाल्या आहेत. त्याचे कार्यारंभ आदेश सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे या कार्यालयाकडून शहादा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आले.

परंतू या तिन्ही कामांचे कार्यारंभ आदेश आजपर्यंत ठेकेदाराला मिळाले नाहीत. तक्रारदार ठेकेदाराने पूर्ण केलेल्या कामाबाबतची ३ कोटी ९२ लाख ७९ हजार २८५ रुपये एवढी बिलाची प्रलंबित रक्कम काढणे व या व्यतिरिक्त प्रस्तावित असलेल्या ३ कामांचे ५ कोटी ३३ लाख रुपये एवढ्या रकमेचे कार्यारंभ आदेश मिळण्याकामी कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील याच्याकडे तक्रारदार ठेकेदाराने वेळोवेळी पाठपुरावा केला.

अनेक वेळा विनंती केली परंतू अभियंत्याने महेश पाटील याने बिलाची रक्कम मंजूर केली नाही. तसेच कार्यारंभ आदेश सुद्धा दिले नाहीत. यानंतर तक्रारदार ठेकेदाराने सदर अभियंत्यांकडे विनंती करून पाठपुरावा केला असता. पूर्ण केलेल्या कामाची बिले काढण्यासाठी वेळोवेळी १० टक्के व तिन्ही कार्यारंभ आदेश देण्यासाठी ०.७५ टक्के ते १ अशा टक्केवारीच्या स्वरूपात एकत्रित ४३ लाख रुपये एवढ्या लाचेच्या रकमेची मागणी केली.

सदर मागणी केलेल्या लाचेच्या रकमेपैकी ३ लाख ५० हजार रुपये एवढी रक्कम कार्यकारी अभियंता महेश प्रतापराव पाटील याला त्याच्या शहादा येथील शासकीय निवासस्थानी तक्रारदार ठेकेदाराकडून पंचासमक्ष स्विकारतांना नंदुरबार लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. याबाबत शहादा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी, सहसापळा अधिकारी पोलीस निरीक्षक समाधान वाघ, पोलीस निरीक्षक माधवी वाघ, पोलीस हवालदार विलास पाटील, पोलीस हवालदार विजय ठाकरे, पोलीस नाईक देवराम गावित, पोलीस नाईक अमोल मराठे, पोलीस नाईक ज्योती पाटील, पोलीस नाईक मनोज अहिरे, पोलीस नाईक संदीप नावाडेकर व चालक पोलीस नाईक जितेंद्र महाले यांच्या पथकाने केली.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790