हृदयद्रावक: त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा गळा आवळून खून

हृदयद्रावक: त्र्यंबकेश्वर येथील आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याचा गळा आवळून खून

नाशिक (प्रतिनिधी) नाशिक- त्र्यंबकेश्‍वर रोडवरील अंजनेरी येथे असलेल्या आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी (ता. २२) अवघ्या साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा आश्रमाच्या कुंपणाबाहेर संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला.

शवविच्छेदन अहवालातून या चिमुकल्याचा सोमवारी (ता. २१) रात्रीच गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यानुसार त्र्यंबकेश्‍वर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आलोक शिंगारे (वय साडेतीन वर्षे, मूळ रा. उल्हासनगर, कल्याण. सध्या रा. आधारतीर्थ आश्रम, अंजनेरी, त्र्यंबकरोड) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलोकची आई सुजाता शिंगारे यांनी गेल्या ऑगस्ट महिन्यात त्यांचा ११ वर्षीय मुलगा आयुष व साडेतीन वर्षीय मुलगा आलोक यास आधारतीर्थ आश्रमात दाखल केले होते.

तर दिवाळीच्या सुट्टी परत घरी नेले होते. गेल्या २०-२२ दिवसांपूर्वीच दोघा मुलांना सुजाता शिंगारे यांनी परत आश्रमात आणून सोडले होते. दरम्यान, मंगळवारी (ता. २२) सकाळी सहा-साडेसहा वाजेच्या सुमारास मुलांना झोपेतून उठविण्यात आले असता, आलोक हा आश्रमाच्या कुंपणांबाहेर मृत अवस्थेत संशयास्पदरित्या आढळून आला.

आश्रमातील मुलांनी सदरची बाब आश्रमातील व्यक्तींना दिली असता, त्यास त्र्यंबकेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर त्र्यंबकेश्‍वर पोलिस आलोकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात घेऊन आले. शवविच्छेनातून आलोक याचा कशानेही तरी गळा आवळून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच, व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group