नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच भीतीपोटी रूग्ण खाजगी रुग्णालयांमध्ये धाव घेत आहेत. म्हणून महापालिकेने सुरू केलेले ४ कोविड केअर सेंटर ओस पडले आहेत. नाशिक शहरामध्ये १० कोविड केअर सेंटर असून, त्यात तपोवन येथील सेंटर ४० बेडचे, विल्होळी येथील १००, गंगापूर यथील ४० तसेच वडाळा येथील ४० बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर बंद आहेत. तर दुसऱ्या बाजूला सरकारी कोविड केअर सेंटर मधून उपचार घेऊन बरेच कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
मात्र, काही रुग्ण विनाकारण खासगी कोविड सेंटरमध्ये जात आहेत. परिणामी जादा बिल आकारणी वरून खटके उडत असल्याचे निदर्शनास येते. ठक्कर डोम येथे ३२५ बेड असून रूग्णसंख्या केवळ १३७ आहे. महापालिकेच्या उपचार पद्धती आणि दर्जाविषयी अधिकाधिक जनजागृती झाली तर रुग्ण खासगी रुग्णालयात न जाता सरकारी रुग्णालयांकडे वळतील तसेच बेड मिळत नसल्याच्या तक्रारीही कमी होतील. सरकारी रुग्णालयांमधील उपचार पद्धती व सोयीसुविधांबाबत अपप्रचार घडत असून, नकारात्मकता रुग्णांपर्यंत पोहचत असल्याच्या चर्चा होताना दिसतात. परिणामी महापालिकेच्या कोविड केअर सेंटर मध्ये चांगल्या सोयीसुविधा व उपचार मिळत नाहीत व प्रशासन अपयशी ठरले असून त्याचा थेट फायदा खाजगी रुग्णालयांना होतो. असा भास निर्माण करून खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण पाठवण्याचे प्रकार सुरू आहेत. यामध्ये महापालिकेतील काही महाभागांचाही समावेश आहे. अशा चर्चा सुरू आहेत.