पहिल्या क्रमांकाची पावती सरकारी तर दुसरी खासगी सॉफ्टवेअरवरील आक्षेपार्ह पावती असल्याचा यतीन कदम यांचा दावा.
नाशिक (प्रतिनिधी): जिल्ह्यात बहुचर्चित आणि वादग्रस्त पिंपळगाव टोल नाक्यावर सरकारी कंपनीऐवजी खासगी सॉफ्टवेअर टाकून टोल वसुलीत रोज लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भाजपचे निफाड विधानसभा अध्यक्ष यतिन कदम यांनी गुरुवारी केला. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना १८ सप्टेंबरला हा प्रकार सांगणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, टोलनाका प्रशासनाने सर्व आरोप फेटाळले आहेत. यावेळी अज्ञात कार्यकर्त्यांकडून टोल नाका व्यवस्थापकासह वान सॉफ्टवेअर इंजिनिअर सुनील बोरसे यांना मा’र’झो’ड करण्यात आली.
टोलनाक्यावर पत्रकार परिषद घेत कदम पुढे म्हणाले, टोल नाक्यावरील २ व १४ क्रमांकाच्या लेन या कँश व्यवहारासाठी आहेत. स्कायलार्क कंपनीने वान हे सरकारी सॉफ्टवेअर बदलून या दोन लेनमध्ये स्वतःच्याच कंपनीचे सॉफ्टवेअर टाकले आहे.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रोज जवळपास आठ ते दहा लाख रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिक येथील कार्यालयाने स्कायलार्क कंपनीला पिंपळगाव बसवंत येथील टोल चालवण्यासाठी दिला असून मागील चार ते पाच महिन्यांपासून कोविडचे कारण देऊन स्कायलार्क कंपनी करारानुसार ठरलेल्या रकमेचा भरणा सरकारला सुपूर्द करीत नसल्याचे निदर्शनास आले. एक ते सहा सप्टेंबर दरम्यान मी स्वतः फास्टटँग वगळता क्रमांक २ व १४ या लेनमधून वाहन नेले.
यावेळी नॅशनल हायवेची टोल पावती न मिळता स्कायलार्क कंपनीच्या स्वतःच्या सॉफ्टवेअरची पावती मिळाली. दुसऱ्या लेनमधील पावत्या या नॅशनल हायवेने ठेका दिलेल्या कंपनीच्या व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या सॉफ्टवेअरनुसार मिळत असल्याचे निदर्शनास आले. स्कायलार्क कंपनी टोल कलेक्शनचा डेटा लपवत स्वतःचे सॉफ्टवेअर लावून नॅशनल हायवेकडून सरकारी पैसा स्वतःच्या खिशात घालत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नाशिकचे प्रकल्प संचालकांना निवेदनाद्वारे आठ सप्टेंबर रोजी याबाबत माहिती दिली.
परंतु त्यावर कोणताही खुलासा आला नाही. त्यामुळे मी हा प्रकार समोर आणला. नॅशनल हायवे व स्कायलार्क कंपनीच्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा अन्यथा त्यांच्या अटकेसाठी जनआंदोलन उभे करण्यात येईल असा इशाराही यावेळी कदम यांनी दिला.
कंपनीकडून कुठल्याही प्रकारची लूट नाही:
कंपनीने काम ४ एप्रिल २०२१ ला सुरू केले. टोल प्रशासनाने सरकारचे सर्व पैसे वेळेत भरलेले असून अशा कोणत्याही प्रकारची लूट कंपनीकडून केली जात नाही. २ व १४ क्रमांकाच्या लेनसाठी आता ज्या पावत्या दिल्या जात आहेत त्या सुरुवातीपासून आहेत. यावर चौकशीही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणार आहे. अज्ञात कार्यकर्त्यांनी मला व वान सॉफ्टवेअर इंजिनिअर सुनील बोरसे यांना मारहाण केली. बोरसे यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्रशासनाने व्हिडिओ फुटेजवरुन मारझोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कायदेशीर कारवाई करावी. – योगेश योगेंद्र सिंग, व्यवस्थापक, स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअर प्रायव्हेट लिमिटेड
चौकशीनंतर कठोर कारवाई:
या प्रकारासंदर्भात सखोल चौकशी करण्यात येणार असून त्या सॉफ्टवेअरविषयी माहिती घेण्यात येणार आहे. योग्य चौकशी करून कठोर कारवाई करण्यात येईल. – दिलीप पाटील, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण