श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी महापालिकेची ‘टॅंक ऑन व्हील’; असं करा स्लॉट बुकिंग

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक महानगरपालिकेच्या वतीने श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सहा विभागात “टॅंक ऑन व्हील”ची संकल्पना राबविण्यात आली आहे त्याची पाहणी आयुक्त कैलास जाधव यांनी केली.
श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगर पालिकेच्या वतीने शहरात नैसर्गिक व कृत्रिम तलाव व्यवस्था करण्यात आली आहे.शहरातील नाशिक पूर्व, पश्चिम, पंचवटी, सिडको, नाशिक रोड, सातपूर या सहा विभागात नैसर्गिक व कृत्रिम तलाव येथे विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली असून मूर्ती दान केंद्र त्या ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
शहरातील ७३ ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली असून त्यामध्ये २७ नैसर्गिक व ४६ कृत्रिम तलाव यांचा समावेश आहे. तसेच यंदाच्या वर्षी नाशिक महानगरपालिकेने शहरातील सहा विभागात “टॅंक ऑन व्हील”ची संकल्पना राबविण्यात आली आहे.
सहा विभागासाठी बनविण्यात आलेल्या वाहनांची पाहणी आयुक्त कैलास जाधव यांनी आज केली यावेळी त्यांच्या समवेत मा.अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे,घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ.आवेश पलोड आदी उपस्थित होते.यावेळी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी “टॅंक ऑन व्हील” या व्यवस्थेचा नागरिकांनी वापर करावा तसेच मनपाच्या वतीने विसर्जना साठी ऑन लाईन स्लॉट बुकिंग ची व्यवस्था www.nmc.gov.in या संकेतस्थळावर केली असून त्याचा जास्तीत जास्त वापर करावा व कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहन केले आहे.