शेअर्स घोटाळ्यात ‘ग्लॅमर’; मुंबईनंतर आता पूजा भोईरचा नाशिकमधील कारनामा समोर, काय आहे प्रकरण?

नाशिक (प्रतिनिधी): इन्स्टाग्रामवर ‘रील्स’ बनविण्यासह मराठी बालकलाकाराची आई म्हणून प्रसिद्ध असलेल्या संशयित पूजा विशांत भोईरच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईत लाखो रुपयांचा गंडा घातल्यानंतर नाशिकमध्येही तिने तीन कोटींपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याची बाब समोर येत आहे.

पन्नासपेक्षा जास्त नागरिकांना गंडा:
शेअर्स घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्लू) मुंबई पोलिसांकडून भोईरचा ताबा घेतला आहे. गुरुवार (दि. ८)पर्यंत पूजा नाशिक पोलिसांच्या ताब्यात असून, ‘ईओडब्लू’चे पथक तपासकामी ठाण्याला रवाना झाले आहे. एप्रिल महिन्यात शेअर्सच्या गुंतवणुकीतून ३३ कोटी रुपयांचा अपहार करून अकरा जणांनी नाशिकच्या पन्नासपेक्षा जास्त नागरिकांना गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला होता.

त्यानंतर २२ मे रोजी तीन कोटी पाच लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुढे आला. त्या प्रकरणी गंगापूररोड परिसरातील सिरीन मिडोज येथील रहिवासी अतुल सोहनलाल शर्मा (वय ६६) यांनी सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार पूजा विशांत भोईर (३२) आणि विशांत विश्वास भोईर (३५, रा. कल्याण, ठाणे) या संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हे ही वाचा:  नाशिक: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर शहरातील नऊ होर्डिंग्ज तत्काळ हटविण्याचे आदेश

या ‘शेअर घोटाळा-२’च्या तपासकामी उपनिरीक्षक रुपेश केदार यांचे पथक भोईर यांच्या अधिक चौकशीसाठी ठाण्यात पोहोचले आहे. पूजा नाशिकच्या पोलिसांच्या ताब्यात असून, या प्रकरणात आणखी तक्रारदार पुढे आल्याची माहिती आहे. दरम्यान, २० जून २०२२ ते २२ मे २०२३ या कालावधीत शर्मांची फसवणूक झाली.

स्वत:चा आर्थिक फायदा करून घेत शर्मांकडून तीन कोटी पाच लाख ११ हजार रुपये वेळोवेळी वेगवेगळ्या स्वरूपात घेतले. मात्र, अपेक्षित परतावा न झाल्या शर्मांनी विचारणा केली. त्यावरून संशयितांनी योग्य उत्तरे न दिल्याने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: भिशीमध्ये गुंतवणूकीस भाग पाडून महिलेची ७६ लाखांची फसवणूक

काय आहे प्रकरण?:
शर्मांच्या क्रिकेट क्लासमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्याने पूजासंदर्भात माहिती दिली. तिच्याकडील ‘अल्गो ऑप्शन्स ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक केल्यास ७.७ टक्के मोबदला देण्याचे सांगितले. त्यावरून शर्मांनी पूजाची मुलगी काम करीत असलेल्या मालिकेतील स्थानिक कलाकारांशी चर्चा करून माहिती घेतली. शरणपूर रस्त्यावरील एका ठिकाणी शर्मांना संशयित दाम्पत्य भेटले. त्यांनी गुंतवणुकीतून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर पूजावर विश्वास ठेवत शर्मांसह नाशिकच्या अनेकांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, कोणताही परतावा मिळाला नाही. पूजाने दिलेले चेकही बाऊन्स झाल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा:  नाशिक शहरात घरफोड्यांचे सत्र सुरुच; दोन लाखाच्या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला

मुंबईतही घोटाळा:
मराठी मालिकांमधून पदार्पण केलेल्या एका बालकलाकाराची पूजा ही आई आहे. पूजा व तिच्या पतीने अनेकांना गंडा घातल्याच्या तक्रारी राज्यभरातून पुढे येत आहेत. कुलाबा परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याची पूजाशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. फोनवर संपर्क सुरू झाला. मैत्री झाल्यानंतर पूजाने या दाम्पत्यालाही गुंतवणुकीचा व्यवसायाबाबत सांगितले. गुंतवणुकीवर दहा टक्के नफा देण्याचेही सांगितले. पूजावर विश्वास ठेवून दाम्पत्याने काही लाखांची गुंतवणूक केली. तेथेही पूजाने परताना न देता दिलेले चेक बाऊन्स झाले. १६ लाखांच्या फसवणुकीच्या प्रकरणात १८ मेच्या दरम्यान तिला कफ परेड पोलिसांनी अटक केली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group