शिवजयंतीचा खाली पडलेला फलक उचलायला गेले; विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): राज्यभरात विविध जिल्ह्यांना अवकाळी पावसाने झोडपले. याच पावसामुळे शिवजन्मोत्सव समितीने लावलेला फलक खाली पडला होता. हा फलक उचलण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांना विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे.

वडनेर रोडवरील राजवाडाकडे जाणाऱ्या चौकात शिवजन्मोत्सव समितीचा फलक लावलेला होता. गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने हा फलक पडला. आज दुपारी रस्त्याने जाणाऱ्या या युवकांनी पडलेला फलक उचलला आणि उभा केला. मात्र याचवेळी घात झाला. फलकाच्या वरून जाणाऱ्या वीज तारेचा या फलकाला स्पर्श झाला आणि त्याचा जबर शॉक या तरुणांना बसला.

हे ही वाचा:  Nashik Breaking: दुभाजक तोडून आयशरची कारला धडक; चार जण जागीच ठार

या दुर्घटनेत अक्षय किशोर जाधव (वय 26) राहणार वडनेर गाव आणि राज मंगेश पाळदे (वय 20) राहणार सौभाग्यनगर हे मृत्युमुखी पडले. तसंच दोन जण किरकोळ जखमी झाले.

नागरिकांनी या चौघांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत जाधव व पाळदे यांची प्राणज्योत मावळली होती. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत राज पाळदे हा एकुलता एक मुलगा होता तर जाधव यांच्या पश्चात दोन भाऊ आहेत. सर्व शिवभक्त, नागरिक, अनेक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी केली होती.

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790