व्यावसायिकांनो सावधान: Phone Pay चा दाखवला खोटा मेसेज; सराफाला 63 हजारांना गंडा

नाशिक (प्रतिनिधी): खरेदी केलेल्या सोन्या-चांदीच्या वस्तूचे पैसे ऑनलाईन फोन पेद्वारे देतो असे सांगत फोन पे केल्याचा बनावट मॅसेज दाखवून दोन भामट्यांनी वणी येथील सराफ व्यावसायिकास गंडा घातला आहे. दुकानातात असलेल्या सीसीटीव्ही व जवळपासच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी घेतले आहे.
”रोकड नाहीये आम्ही फोन पे करणार” आणि मग…
वणी शहरातील शिंपी गल्लीतील सौभाग्य जैन ज्वेलर्स नावाचे संजय मांगीलाल जैन यांचे दुकान असून मंगळवारी (ता.२१) दुपारी एकच्या सुमारास दुकानात ३० ते ३५ वयोगटातील दोन अनोळखी व्यक्ती स्कुटीवरुन आल्या. त्यांनी दुकानातील सोन्या चांदीच्या वस्तू बघत ६.६३ व ४.६० ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच ५७.८०० ग्रॅम वजनाची चांदीचे पैजण असे एकूण ६३ हजार ५०० रुपये किंमतीचे दागिने खरेदी केले.
त्यांनी आमच्याकडे रोख पैसे नसल्याने आम्ही फोन पे द्वारे ऑनलाईन पेमेंट करीत असल्याचे सांगत त्यांनी त्याचा मोबाईल क्रमांक ७०४१८१५७४४ या क्रमांकाचे फोन पे वरुन, फिर्यादीचा भाऊ मयूर जैन यांचा फोन पे क्रमांक ८८०५६४७०४४ यावर ६३,५००/-रुपये फोन पे ने ऑनलाईन टाकल्याचा बनावट मॅसेज टाकला. पैसे पे केल्याचा मॅसेज फिर्यादीस दाखवून खरेदी केलेल्या वस्तू घेत स्कुटीवरून फरार झाले.
ज्यांच्या नंबरवर फोन पे केले ते मयूर जैन हे बाहेरगावी असल्याने त्यांनी फोन पे सक्सेसचा मॅसेज आल्याने त्यांनी मॅसेज गर्दीत वरचेवर बघितला. त्यानंतर त्यांनी खात्यात पैसे जमा झाले, की नाही याबाबत मॅसेज नंतर दहा पंधरा मिनिटांनी खात्री केली असता, पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा न झाल्याचे दिसले. त्या व्यक्तिंनी पाठवेला फोन पे चा मॅसेज बनावट असून फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. याबाबत संजय जैन यांनी वणी पोलिसांत आज (ता.२२) दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दुकानातात असलेल्या सीसीटीव्ही व जवळपासच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासासाठी घेतले आहे. सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील राजपूत, पोलिस उपनिरीक्षक प्रविण उदे तपास करीत आहेत.