विवाहित प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी तिच्या मुलाचे अपहरण; प्रियकराला नाशिकमध्ये अटक!

शिक कॉलिंगचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

विवाहित प्रेयसीसोबत संसार थाटण्यासाठी तिच्या मुलाचे अपहरण; प्रियकराला नाशिकमध्ये अटक

नाशिक (प्रतिनिधी): जुने प्रेम मिळवण्यासाठी विवाहित प्रेयसीच्या चार वर्षीय मुलाचे अपहरण करणार्‍या प्रियकराला नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात अटक करण्यात आली आहे.

लग्नानंतर प्रियकरासोबत जाण्यास प्रेयसीने नकार दिला होता. त्याचा राग मनात धरून अखेर आरोपी प्रियकराने चिमुरड्याचे अपहरण केले. मुलाच्या अपहरणानंतर पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपी प्रियकराला बेड्या ठोकल्या.

लग्नापूर्वी एका 32 वर्षीय महिलेचे 27 वर्षीय तरुणाशी पाच वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र तिचा विवाह दुसर्‍या तरुणाशी झाला. तरी देखील प्रियकर आपले जुने प्रेम विसरायला तयार नव्हता. शिवाय प्रेयसीला कसेही करून आपल्या सोबत राहण्यासाठी त्याने तगादा लावला होता. मात्र तिने प्रियकराला नकार दिला. त्यातूनच त्याने तिच्या चार वर्षीय चिमुरड्याच्या अपहरणाचा कट रचल्याचे पोलीस तपासात समोर आले.

हे ही वाचा:  नाशिक: 'या' सराफ व्यावसायिकाकडे 26 कोटी रुपये रोख अन् 90 कोटी रुपयांच्या संपत्तीची कागदपत्रे जप्त!

विशेष म्हणजे चिमुरड्याचे अपहरण करून प्रेयसीला घेऊन गावी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या प्रियकराला नाशिकरोड रेल्वे स्थानकात भिवंडीतील शांतीनगर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने अवघ्या 12 तासात ताब्यात घेत अटक केली आहे. रिपोन आकाश अली व्यापारी (वय 27, रा. प. बंगाल) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी रिपोन हा मूळचा पश्चिम बंगाल राज्यातील कुचबिहार जिल्ह्याचा रहिवाशी आहे. तर तक्रारदार आयशा ही देखील पश्चिम बंगाल राज्यातील कुचबिहार जिल्ह्यातील रहिवाशी आहे. या दोघांचे लग्ना आधीच प्रेमसंबंध होते. त्यातच भिवंडीतील टेमघर येथील चाळीत राहणारे मोहम्मद अली फकीर या तरुणासोबत तिचा निकाह झाला. त्यानंतर मोहम्मद अली आणि त्याची पत्नी आयशा बीबी आपल्या चार वर्षीय आशिक अली मोहम्मद अली फकीर या मुलासह टेमघर परिसरात राहत होते. प्रेयसीला अधुनमधून भेटण्यासाठी त्याने तिच्या पतीशी ओळख करून मैत्री केली होती. त्यातच तिला मूळ गावी जाऊन आपला संसार थाटू असे म्हणत आरोपी प्रियकराने तिच्याकडे तगादा लावला होता. मात्र ती त्याला नकार देत होती. त्यामुळे त्याने तिच्या चिमुरड्याच्या अपहरणाचा कट रचला होता.

हे ही वाचा:  नाशिक: जॉबचे आमिष दाखवून ११ युवकांना ६५ लाखांचा ऑनलाईन गंडा

3 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी हा मुलगा घराबाहेर खेळत असताना आढळून आला नाही. त्यामुळे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आशिक अली याची आई आयशा बीबी यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अपहरण-कर्त्याचा शोध सुरु केला.

दरम्यान पाच वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या प्रियकर रिपोन व्यापारी याने विवाहित प्रेयसीच्या मोबाईलवर संपर्क साधून तुझा मुलगा माझ्याजवळ असून तू माझ्या सोबत राहायला ये, जर तू नाही आली तर तुझ्या मुलाला जीवे मारेन, अशी धमकी दिली होती. त्यानंतर तिने पोलिसांशी संपर्क साधून मुलाच्या अपहरणाची माहिती दिली. पोलिसांनी आरोपीचे मोबाईल लोकेशन तपासले असता, तो नाशिक शहरात असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे आणि पोलीस पथकाने तातडीने दोन पथक तयार करून आरोपीला पकडण्यासाठी नाशिकला रवाना केले.

हे ही वाचा:  नाशिकमध्ये चार दिवस पावसाचा अंदाज; विदर्भ, जळगावला उष्णतेची लाट...

तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यासाठी मुलाच्या आई सोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक मुक्ता फडतरे या स्वतः रेल्वेने नाशिक येथे पोहचल्या होत्या. शिवाय आरोपी चिमुरड्याच्या आईशी सतत संपर्कात असतानाच, नाशिकरोड रेल्वे स्टेशनजवळील पुलावर आरोपी रिपोन व्यापारी उभा असल्याचे दिसले. त्यानंतर महिला पोलीस अधिकारी मुक्त फडतरे यांनी त्याला शिताफीने अटक केली. अन् अपहरण झालेल्या चिमुरड्याची त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केली. अवघ्या बारा तासातच आरोपीला पकडून बेड्या ठोकल्याने पालकांसोबतच पोलिसांनीही सुटकेचा नि:श्‍वास सोडला…!

Loading

The Title "Nashik Calling" is approved by Office Of The Registrar Of Newspapers For India (Ministry Of Information And Broadcasting). RNI: MAHMAR51790
×
⚡Join Our Group